मलकापूर- वर्कशॉपमधील चोरीस गेलेले साहित्य व मुद्देमाल वापस घेण्यास गेलेल्या तिघांवर म्हाडा कॉलनीतील आरोपी मनोजसिंग,प्रतापसिंग, धर्मेंद्रसिंग यांनी हल्ला चढवित तलवार,लोखंडी पाईप,काठ्याचे वार करून गंभीर जखमी केल्याची घटना १२ एप्रिल रोजी रात्री ८ वाजेच्या दरम्यान घडली. यामध्ये दोघांना गंभीर जखमा व दुखापत झाल्याने उपचारार्थ बाहेरगावी रेफर केले आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, म्हाडा कॉलनी परिसरातील आरोपी मनोजसिंग,प्रतापसिंग, धर्मेंद्रसिंग यांनी चारखांबा चौकातील आजम गौरी यांच्या वर्कशॉप मधील तांब्याच्या तार, लोखंड यासह आदी साहित्य चोरून नेल्याचे समोर आले होते. त्यानंतर आजम गौरी यांनी १२ एप्रिल रोजी सकाळी शहर पोलीस स्टेशनला जाऊन वर्कशॉपमध्ये चोरी झाल्याची तक्रार दिली असता पोलीसांनी त्यांच्या सोबत म्हाडा कॉलनी येथे जाऊन तपास केला. मात्र त्यावेळी त्यांना संबंधित आरोपी हे घरी आढळून आले नव्हते. तर या घटनेतील आरोपी हे दुपार दरम्यान आजम गौरी यांचेशी संपर्क करून तुम्ही दिलेली तक्रार मागे घ्या, आमचे घरी या मी चोरलेला माल तुम्हास परत करतो असे सांगितले.
त्यानंतर रात्री ८ वाजेच्या दरम्यान आजम गौरी, नाजीम शेख, मोहम्मद अबुजर हे तिघे जण चोरीस गेलेला माल घेण्यासाठी म्हाडा कॉलनीे येथे गेले असता त्याठिकाणी त्यांच्याशी दुपारी संपर्क करणार्या आरोपीने वाद घालून त्यांच्यासह अन्य दोघांनी माल घेण्यास आलेल्यावर तलवारीने वार केले. यामध्ये अबुजर चव्हाण (वय २५) याच्या मानेवर, नाजीम शेख (वय ३२) याच्या हातावर तलवारीचे वार लागल्याने हे दोघे गंभीर जखमी झाले. तर वर्कशॉप मालक आजम गौरी हे सुध्दा यामध्ये जखमी झाले. महोम्मद अबुजर याला जळगाव येथे तर नाजीम शेख याला गंभीर दुखापत असल्याने बुलढाणा येथे उपचारार्थ रेफर करण्यात आले. तसेच आजम गौरी यांच्यावर मलकापूर येथे उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठत चोख बंदोबस्त लावला. याप्रकरणी यांच्या फिर्यादीवरून आरोपी मनोजसिंग, प्रतापसिंग, धर्मेंद्रसिंग यांचे विरुध्द भारतीय दंडसहिता कलम 307,324,427,506,34 नुसार गुन्हा दाखल झाला आहे.शहर पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी यांच्या नेतृत्वात पोलीस कर्मचारी हे पुढील तपास करीत आहेत.