बुलढाणा : सिंदखेडराजा तालुक्यातील बहुचर्चित बारावी गणित प्रश्नपत्रिका फुटप्रकरणी साखरखेर्डा पोलीस व ‘एसआयटी’ चा तपास आता निर्णायक टप्प्यात पोहोचला आहे. लोणार येथील खासगी शिक्षण संस्थेचा मुख्याध्यापक अब्दुल अकिल अब्दुल मूनाफ हा मुख्य आरोपी असल्याच्या निष्कर्षाप्रत पोलीस आले आहेत. दुसरीकडे, वाढीव पोलीस कोठडीत त्याच्याकडून आणखी महत्त्वपूर्ण माहिती मिळण्याची दाट शक्यता आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस सूत्रांनी दिली.
लोणार येथील झाकिर हुसेन उच्च माध्यमिक विद्यालयाचा मुख्याध्यापक असलेला अब्दुल अकिल हा प्रश्नपत्रिका फुटीचा सूत्रधार असल्यावर आजवरच्या तपासांती जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे. यामुळेच इतर सात आरोपींना न्यायालयीन कोठडी मिळाली. मात्र, तपास यंत्रणांनी १० मार्चला केवळ अब्दुल अकिल याच्याच पोलीस कोठडीत वाढ करण्याची विनंती केली. देऊळगाव राजा न्यायालयाने ती मान्य केली.
झाकिर हुसेन उच्च माध्यमिक विद्यालय लोणार येथे प्राचार्य म्हणून कार्यरत अकिल यानेच बारावीचा गणिताचा प्रश्नपत्रिका फोडली, असा पोलिसांचा कयास असल्याचे सूत्रांनी सांगितले. इतर आरोपींनी बारावीच्या गणिताची प्रश्नपत्रिका प्रसारित केली. लाभार्थी विद्यार्थ्यांसाठी एक विशिष्ट ‘व्हॉट्सअॅप’ ग्रुप तयार करण्यात आला. याची जवाबदारी सिंदखेड राजा तालुक्यातील शेंदुर्जन येथील संस्कार महाविद्यालयाच्या गोपाल दामोदर शिंगणे याने सांभाळली. मात्र, इतके सुसज्ज नियोजन करूनही बिंग फुटलेच.
दरम्यान, या प्रकरणात प्रश्न शोधून सहकार्य करणाऱ्यांमध्ये एक महिला सहभागी असल्याच्या संशय आहे. त्या दिशेने तपास करण्यात येत असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. तसेच परीक्षेच्या काही दिवसांपूर्वी आलेल्या प्रश्नपत्रिका सांभाळण्याची जवाबदारी असलेले कस्टोडियन व रनर यांचा काही सहभाग आहे का? याचाही तपास करण्यात येत आहे. वितरण केंद्र ते परीक्षा केंद्रादरम्यान सीलबंद प्रश्नपत्रिकांची ने-आण करण्याची जवाबदारी ‘रनर’वर असते. या प्रकरणी चार खासगी संस्थांच्या शिक्षकांना निलंबित करण्यात आले आहे. यात मुख्य आरोपी अब्दुल अकिल याचाही समावेश आहे.