मलकापूर
आज १२ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वरील तालसवाडा गावानजीक टिप्पर व आयशरची भीषण धडक झाल्याने यामध्ये ३ जण ठार तर १ जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर तालसवाडा नजीक असलेल्या नदीच्या पुलावर टिप्पर क्र.एमएच ४८ जे ००६१ हे विटांनी भरलेले आयशर मुक्ताईनगरकडून मलकापूरकडे येत होते. महामार्गाच्या चौपदरी कामाकरीता वाहण्यात येत असलेल्या माती घेवून जात असलेले कल्याण टोल प्रा.लि. चे टिप्पर क्र. एमएच ४६ एएफ २७८२ हे माती भरून मलकापूरकडे येत असतांना या दोन्ही वाहनांमध्ये जबर धडक सकाळी ७.३० वाजता झाली. या धडकेत मोताळा तालुक्यातील मोहेगाव येथील राजू रतन चव्हाण (वय ३७), जीवन सुरेश राठोड (वय २७) व सुनिल ओंकार राठोड (वय ३३) रा. मोहेगाव यांचा घटनास्थळी दुदैवी मृत्यू झाला. तर राम मलखंब राठोड (वय २६) गंभीर जखमी झाले. जखमीवर बुलडाणा येथील एका रूग्णालयात उपचार सुरु आहे.
या अपघातामध्ये आयशरच्या समोरील भागाचा अक्षरश: चुराडा झाला. अपघातामध्ये मोहेगाव येथील तिघांचा दुर्देवी मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे. सदर टिप्परचा चालक टिप्पर सोडून फरार झाला असून पोलिसांनी ते टिप्पर ताब्यात घेतले आहे.