मलकापूर
देशी कट्टा घेऊन गणवाडी गावाकडे जाणार्या दोघा भावांपैकी एकास पोलिसांनी ताब्यात घेत त्याच्याकडून देशकट्टा व फायर झालेले राऊंडसह ४८ हजार ६०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची कारवाई मलकापूर शहर पोलीस स्टेशनचे पोनि अशोक रत्नपारखी यांच्या मार्गदर्शनात शहर पो.स्टे.च्या पथकाने ५ फेब्रुवारी रोजी केली. तर यातील दुसरा भाऊ पळून जाण्यात यशस्वी झाला असून त्याचा शोध पोलिस घेत आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, दोन इसम त्यांचे जवळील लाल रंगांचे स्कुटी वरुन देशी कट्टा घेवून गणवाडी गांवाकडे जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाल्यावरून त्यांनी गणवाडी रोडवरील गुरुद्वाराजवळ सापळा रचून मिळालेल्या माहितीप्रमाणे वाहनाचा शोध सुरू केला.
दरम्यान एका लाल रंगाचे स्कुटीवर दोन इसम डबलसीट मलकापूर कडून गणवाडी गांवाकडे जातांना दिसले. त्यांना हात देवून थांबवले असता पो. स्टे. अभिलेखावरील सराईत गुन्हेगार नामे शेख साबीर शेख अहेमद (वय २८ वर्ष) रा. सायकलपुरा मलकापुर जि. बुलढाणा व त्याच्या मागील असलेला एक जण पळून जाण्यात यशस्वी झाला. त्याच्याबाबत शेख सावरला पोलिसांनी महिती विचारली असता त्याने तो माझा भाऊ शेख तालिब शेख अहमद (वय २५ वर्ष) रा. सायकलपुरा मलकापूर जि. बुलढाणा हा असल्याचे सांगीतले.
यावेळी शेख साबीर शेख अहेमद याची व त्याच्या ताब्यातील लाल रंगांची होंडा कंपनीची एक्टीवा ३ जी एम. एच. ०३ एयु ७३७२ ची झडती घेतली असता तिचे डिकीमध्ये एक काळ्या रंगांची पिस्टल ग्रीप असलेली गावठी बनावटीची स्टील बॉडी असलेली पिस्टल मिळून आली. सदर पिस्टल पंचासमक्ष ताब्यात घेवून तिचे मोजमाप केले असता तिची लांबी ६.८ इंच, पिस्टल ग्रीपची लांबी ३.७ इंच, बॅरल बोअर अपशू व बॅरलची लांबी ३.५ इंच व मॅगझीन ची लांबी ४.२५ इंच व रुंदी १ इंच किंमत अंदाजे ८ हजार रूपये तसेच त्याचे सोबत मिस फायर झालेले पितळी रंगांचे ज्याला तांब्याचे बुलेट लावलेले असलेले ३ काडतुस अशू चे व २ तांब्याच्या फायर झालेल्या बुलेटचे हेड किंमत -अंदाजे ६०० रुपये असा एकुण ८६०० रुपये व सदर गुन्ह्यात वापरलेली मोटार सायकल किंमती अंदाजे ४० हजार असा एकूण ४८ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करून जागीच सिलबंद करण्यात आला.
या प्रकरणी पोकॉ. गोपाल तारूळकर यांच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी आरोपी शेख साबीर शेख अहेमद (वय २८) रा. सायकलपुरा मलकापूर व शेख तालिब शेख अहेमद (वय २५) रा. सायकलपुरा मलकापूर या दोघांविरूध्द गावठी बनावटीचे पिस्टल, २ फायर झालेले राउंड तसेच २ फायर झालेले राउंड हे वाहतुक करतांना मिळून आल्याने कलम ३, २५ आर्म अॅक्टप्रमाणे प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. सदरची कारवाई पो. नि. अशोक रत्नपारखी यांच्या मार्गदर्शनात पोउपनी ईश्वर सोळंके, पोकों आसिफ शेख, प्रमोद राठोड, पोका संतोष कुमावत, पोका ईश्वर वाघ, पोकॉ सलीम बरडे आदींनी केली.