Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

अवैध देशी मद्य विक्रीवर राज्य उत्पादन शुल्कचा छापा;दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

 


     बुलडाणा, दि. 21 : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने सावखेड  भोई, ता. देऊळगावराजा येथे अवैध देशी मद्य विक्री करणाऱ्या एकावर शनिवारी, दि. 19 नोव्हेंबर 2022 रोजी कारवाई केली. यात एका व्यक्तीविरूद्ध गुन्हा नोंद करून एका वाहनासह दोन लाख 3 हजार 900 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.


चिखली येथील राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक आणि दुय्यम ‍निरीक्षक यांच्या पथकाने सावखेड  भोई, ता. देऊळगावराजा येथे एक वारस गुन्हा नोंदवून कारवाई केली. यात एक आरोपी प्रवीण वसंता  हांडे, रा. देऊळगाव राजा याच्याविरूद्ध कारवाई करण्यात आली. कारवाईत एक  इंडिका कार क्रमांक एमएच 42  एच 4427 आणि जालना जिल्ह्यातील 138.6 लिटर देशी मद्यासह एकुण 2 लाख 3 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत निरीक्षक जी. आर. गावंडे, दुय्यम निरीक्षक आर. ई. सोनुने, एस. डी. चव्हाण यांच्यासह एस. डी. जाधव, श्री. निकाळजे, श्री. अवचार यांनी सहभाग घेतला.


          राज्य उत्पादन शुल्क विभागार्फत अधीक्षक भाग्यश्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 1 जानेवारी 2022 ते दि. 21 नोव्हेंबर 2022 या कालावधीत एकुण 1 हजार 137 गुन्हे नोंदविण्यात आले आहे. यात 1 हजार 42 वारस गुन्ह्यासह 1 हजार 83 आरोपी आणि 74 वाहनासह एकुण 1 कोटी 41 लाख 12 हजार 164 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच नोव्हेंबर 2022 मध्ये 77 गुन्हे नोंदवून 73 वारस गुन्ह्यासह 8 वाहने जप्त करण्यात आली आहे. यात 77 आरोपीसह 10 लाख 56 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


नागरिकांनी राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाचा मद्यसेवन परवाना प्राप्त करुन केवळ शासनमान्य अबकारी मद्य विक्री अनुज्ञप्त्यांमधूनच मद्य खरेदी करून सेवन करावे. अवैध मद्य ‍विक्री करणाऱ्या ढाबामालक आणि त्याठिकाणी अवैध मद्यसेवन करणाऱ्या ग्राहकांवर कारवाई करण्यात येत आहे. ढाबा मालकाला 40 हजार रूपये आणि मद्यसेवन करणाऱ्या ग्राहकांना प्रत्येकी 5 हजार रुपये दंड आकारण्यात आला आहे.


आतापर्यंत हॉटेल विघ्नहर्ता भानखेड शिवार, हॉटेल रायबा ढाबा खांडवी, ता. जळगाव जामोद, तसेच हॉटेल साईराज आसलगाव, ता. जळगाव जामोद, हॉटेल गारवा ढाबा, वरवंड, ता. जि. बुलडाणा, हॉटेल विराट ढाबा, बोराखेडी, ता. मोताळा, हॉटेल काकाजी ढाबा, पेठ, ता. चिखली, हॉटेल सत्यम ढाबा, नवघरे शिवार, ता. चिखली, हॉटेल न्यू मुंबई स्वाद ढाबा, नांदुरा, ता. नांदुरा, हॉटेल भारत, भाजी मंडी, लोणार, हॉटेल श्रीयोग, मेहकर फाटा, ता. चिखली, हॉटेल सुरज धाबा, मलकापूर पांग्रा, ता. सिंदखेड राजा, हॉटेल राजधानी, लोणार, हॉटेल अन्नदाता, मेहकर, हॉटेल पुर्णामाय ढाबा, मानेगाव शिवार, ता. जळगाव जामोद या ढाब्यांवर कार्यवाही करण्यात आली आहे.


आपल्या परिसरात अवैध मद्यविक्री अथवा बनावट मद्य निर्मिती आढळल्यास विभागाचा टोल फ्री क्रमांक 1800833333 वर किंवा व्हॉटॲप क्रमांक 8422001133 वर किंवा excisesuvidha.mahaonline.gov.in या विभागाचे पोर्टलवर तात्काळ माहिती कळवावी. जिल्ह्यातील किरकोळ व ठोक मद्य अनुज्ञप्तीधारकांच्या अनुज्ञप्तीमध्ये बनावट मद्य आढळून आल्यास त्यांची अनुज्ञप्ती कायमस्वरुपी रद्द करण्यात येणार आहे. तसेच मद्य बाळगताना मद्य सेवन, मद्य वाहतूक करताना अथवा मद्य विक्री करताना परवाना असणे आवश्यक आहे. तसेच ढाबा मालकांनी आपल्या जागेचा वापर अवैध मद्यसेवनासाठी दिल्यास त्यांच्यावर महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 अंतर्गत कठोर कार्यवाही करण्यात येणार असल्याचे राज्य उत्पादन शुल्कच्या अधीक्षक भाग्यश्री जाधव यांनी कळविले आहे.