मलकापूर प्रतिनिधी
जिल्ह्यातील पॅथॉलॉजी लॅब धारकांकडून तपासणी शुल्काच्या नावाखाली होणारी लुट थांबवून प्रत्येक पॅथॉलॉजीमध्ये दरपत्रक दर्शनी भागामध्ये लावण्याबाबत निर्देश देण्यात यावे अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपप्रमुख अजय टप यांनी आज २ जुलै रोजी जिल्हा आरोग्य अधिकारी बुलडाणा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बुलडाणा जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यात व गावोगावी पॅथॉलॉजी लॅब आहेत. या लॅबच्या माध्यमातून रूग्णांच्या रक्त- लघवी नमुने तपासणीचे काम केले जाते. मात्र हे करीत असतांना प्रत्येक गावामध्ये व प्रत्येक लॅबला शुल्क हे वेगवेगळे असतात. तपासणी ही वेगवेगळी असते मात्र एका आजाराच्या तपासणीचे शुल्क हे वेगवेगळ्या लॅबमध्ये वेगवेगळे आकारण्यात येते. त्यामुळे हा प्रकार काय आहे? हे न समजणारे कोडे आहे. तसेच अशा प्रकारामधून आधीच आजारपणामुळे त्रस्त असलेल्या रूग्णांना आणखी आर्थिक व मानसिक त्रास देण्याचाच हा प्रकार असून गोरगरीब जनतेची ही एकप्रकारे सर्रास लुटच आहे. त्यामुळे या पॅथॉलॉजी धारकांना दर्शनी भागामध्ये दरपत्रकाचे फलक लावण्याचे सूचित करण्यात येवून गोरगरीब जनतेची व रूग्णांची लुट थांबविण्यात यावी.
त्याचप्रमाणे अनेक गावांमध्ये बोगस पॅथॉलॉजी लॅब थाटण्यात आल्या असून त्यांच्याकडे अधिकृत परवाने नसल्याचीही बाब समोर येत असतांनाही अशा पॅथालॉजी लॅब धारकांवर आरोग्य विभागाकडून कारवाई का करण्यात येत नाही, त्यांना अभय का दिले जाते. असाही प्रश्न अजय टप यांनी उपस्थित केला असून अशा पॅथॉलॉजी धारकांकडून रूग्णांची व सामान्य जनतेची होणारी लुट तात्काळ थांबविण्याकरीता तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा त्यांनी निवेदनाच्या शेवटी दिला आहे.