मलकापूर प्रतिनिधी
नांदुरा तालुक्यातील ग्राम सावरगाव चाहू येथील अमोल जाधव (२६) या तरुणाचा सावरगाव चाहू परिसरात गळा आवळून खून झाल्याची घटना ३० जून रोजी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी आरोपी विरुद्ध मलकापूर ग्रामीण पोलिस स्टेशनला भादंवि कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत संदीप अंकुश जाधव राहणार सावरगाव चाहु तालुका नांदुरा याने नांदुरा पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रार दिली की, २९ जून रोजी रात्री आम्ही कुटुंबासह जेवण केले. जेवण केल्यानंतर रात्री अंदाजे दहा वाजेच्या सुमारास माझा भाऊ मयत अमोल अंकुश जाधव यांच्या मोबाइलवर कुणाचा तरी फोन आला. म्हणून अमोलने आईला गावातून येतो, असे सांगून निघून गेला व परत आलाच नाही.
त्याचा फोनवर आईच्या फोनवरून संपर्क केला असता त्याचा फोन बंद येत होता. दरम्यान, सकाळी गावातील गजानन कांडेलकर हे आमच्या घरी आले व त्यांनी सांगितले की, सावरगाव चाहू येथे सोसायटी गोडाऊनच्या मागे अमोल मृतावस्थेत पडलेला आहे. त्यानंतर आम्ही त्या ठिकाणी गेलो असता अमोल हा मरून पडलेला होता व त्याचा गळा आवळल्याचे व्रण दिसून येत होते. त्याला कोणीतरी मारून टाकले आहे. अमोल घरुन निघून गेल्यानंतर त्याला काही तरी मजुरीचे काम मिळाले असेल ते संपल्यावर तो घरी येईल असे समजून सर्वजण घरी झोपून गेले होते. मात्र दुसऱ्या दिवशी त्यांचा मृतदेह सापडल्याचे समजले अमोल अंकुश जाधव याचा कशाने तरी गळा आवळून, त्यास जिवाने मारुन टाकले आहे. अशा या तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.