प्रतिनिधी
आसलगाव येथील सीआयएसएफ जवान राहुल मुळे (३३) कर्तव्यावर असताना जम्मू-काश्मिर येथील शासकीय रुग्णालयात ब्रेन हॅमरेजमुळे वीरमरण आले आहे. त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. राहुल मुळे हे सीआयएसएफमध्ये २०१७ मध्ये भरती झाले होते. दरम्यान पाच वर्षात त्यांनी छत्तीसगड, पश्चिम बंगाल त्यानंतर जम्मू-काश्मीर येथे कर्तव्य बजावत होते. दरम्यान त्यांना जम्मू-काश्मीर येथे अर्धांगवायूचा झटका आला होता. दरम्यान, २० जून रोजी त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलिसांनी त्यांना मानवंदना दिली.
तर राहुल यांचे वडिल शामराव मुळे यांनी त्यांच्या पार्थिवास अग्निडाग दिला. त्यांच्या पश्चात पत्नी पौर्णिमा, एक मुलगी, आई, वडिल असा परिवार आहे. अंत्यसंस्कार प्रसंगी नायब तहसीलदार एस. व्ही. मार्कंड, मंडळ अधिकारी विलास खेडेकर, तलाठी सुर्वे, तलाठी शिंदे, सरपंच सुनील डिवरे, रामविजय बुरुंगुले, प्रकाश ढोकणे, मधुकर ढोले, डॉ. अपर्णा कुटे, बाळू कुटे, अॅड. ज्योती ढोकणे यांच्यासह परिसरातील नागरिकांची उपस्थित होते.