प्रतिनिधि वैजापूर भारती कदम
वैजापूर-तालुक्यातील लाखणी येथील वाळूपट्टयात अवैधरित्या वाळूची तस्करी रोखण्यासाठी गेलेल्या तहसीलदारांवर जेसीबी यंत्राच्या साह्याने जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी शिऊर पोलिसांनी चौघांना बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान पोलिसांनी वैजापूर येथील न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना 16 मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
योगेश आबाराव निकम (31 ) , विलास यादव मुळे (41 ), अनिकेत संतोष मुळे (19 ) तिघेही रा. देवळी ता. गंगापूर व मनवर महमूद शाह (21 ) रा गंगापूर अशी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत. या घटनेबाबत तालुक्यातील लाखणी येथील शिवना नदीच्या पात्रातून जेसीबी यंत्राच्या साह्याने वाळूचे उत्खनन सुरू असल्याची माहिती तहसीलदार राहूल गायकवाड यांना मिळाली होती. त्यानुसार गायकवाड यांनी आपल्या सुरक्षारक्षकासह अन्य कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन ते लाखणी येथील वाळूपट्टयाकडे निघाले. तेथे पोहचल्यानंतर त्यांना वाळूपट्टयात विनाक्रमांकाच्या जेसीबी यंत्राच्या साह्याने वाळूचे उत्खनन करून ती हायवा ट्रकमध्ये भरली जात असल्याचे निदर्शनास आले. तहसीलदार राहूल गायकवाड यांनी जेसीबी यंत्र व हायवा ट्रक पकडल्यानंतर दोन्हीही वाहने वैजापूर येथील तहसील कार्यालयात घेण्यास सांगितले.
त्यानंतर जेसीबी चालकाने भ्रमणध्वनीव्दारे संपर्क साधून त्याच्या एका सहकाऱ्याला बोलावून घेतले. त्या दोघांनीही वाहने सोडून द्या. असे तहसीलदारांना सांगितले. परंतु तहसीलदारांनी त्यांची विनंती धुडकावून लावली. त्यामुळे रागाच्याभरात एकाने थेट तहसीलदारांसह कर्मचाऱ्यांच्या अंगावर जेसीबी चालविण्याचे जेसीबी चालकाला सांगितले. जेसीबी चालकाने मागेपुढे न पाहता जेसीबी यंत्राची टोकदार बकेट थेट तहसीलदारांसह सुरक्षारक्षक व अन्य दोन कर्मचाऱ्यांच्या अंगावर नेत त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. सर्वांनीच प्रसंगावधान राखून सुटका करून घेतल्याने ते बचावले. त्यानंतर ते तेथून फरार झाले. याप्रकरणी तहसीलदार राहूल गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून माफियांविरुध्द शिऊर पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान उपविभागीय पोलिस अधिकारी कैलास प्रजापती यांच्या मार्गदर्शनाखाली शिऊर पोलिसांची पथके तयार करून माफियांचा शोध घेतला. पोलिसांनी त्यांचा शोध घेऊन चौघांना 13 मार्च रोजी अटक केली. वैजापूर येथील न्यायालयासमोर त्यांना हजर केले असता न्यायालयाने चौघांना 16 मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान अजून काही आरोपी अद्याप ही फरार असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.