प्रतिनिधि वैजापूर भारती कदम
बेकायदा गौण खनिज उत्खनन प्रकरण
वैजापूर समृध्दी महामार्गाचे कंत्राटदार असलेल्या बांधकाम कंपनीकडून वैजापूर तालुक्यातील काही गांवातील शेतकऱ्यांच्या जमिनीमधून गौण खनिजाचे बेकायदेशीर उत्खनन होत असून कंपनी व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांविरुध्द गुन्हा दाखल करावा व नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मोबदला द्यावा अशी मागणी करणारी याचिका पालखेडचे माजी सरपंच नंदकिशोर जाधव यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केली आहे. ॲड.सिद्धेश्वर एस.ठोंबरे यांच्यामार्फत ही याचिका दाखल करण्यात आली आहे.या प्रकरणी माहिती सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाचे न्यायाधिश एस.व्ही गंगापूरवाला व न्यायाधिश एस.जी.दिगे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. जाधव यांनी दाखल केलेल्या या याचिकेत राज्य शासन, मुख्य सचिव महसूल, मृदसंधारण व सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, विभागीय आयुक्त, पोलीस अधीक्षक, वैजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कंपनीसह तलाठ्यांना प्रतिवादी करण्यात आले आहे.
वैजापूर तालुक्यातील पालखेड, शिवराई, माळीसागज, बेंदवाडी व इतर गावातील शेतकऱ्यांच्या जमिनीमधून बेकायदेशीर गौण खनिजाचे उत्खनन केल्याबाबत तसेच बऱ्याच पाझर तलावाच्या संरक्षक भिंती खोदल्यामुळे तलाव फुटण्याची भीती निर्माण झाल्याबाबत तसेच काही गावांमध्ये पंचनामे करून तहसीलदारांच्या बोगस स्वाक्षऱ्या करून जिल्हाधिकाऱ्यांकडून उत्खननाच्या परवानग्या घेतल्याबाबत तक्रारी दिल्या तरी जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई केली नाही असे याचिकेत म्हटले आहे. गौण खनिज उत्खनन आणि पाझर तलावांचे नुकसान केल्याविषयी सचीव स्तरावर विशेष चौकशी पथक तयार करून समृध्दी महामार्गाचे कंत्राटदार कंपनीकडून रायल्टी व दंड वसूल करून या रायल्टीतून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मोबदला देण्यात यावा तसेच कंपनीच्या वाहनांनी मुरुमाची वाहतूक केल्यामूळे खराब झालेल्या रस्त्यांची पुनर्बांधणी करण्यात यावी.महसूल अधिकारी,कर्मचारी आणि अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात यावे अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे.