प्रतिनिधि वैजापूर भारती कदम
वैजापूर बस चालकांवर हल्ला करून शासकीय कामात अडथळा निर्माण करणाऱ्या एकाला येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायधीश एम मोहिद्दीन शेख एम ए यांनी ता.१५ रोजी तीन वर्षे साध्या सजेसह दंडाची शिक्षा सुनावली. सागर मधुकर मांजरे रा.अहमदनगर असे शिक्षा ठोठाविण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, किशोर जयराम तेलकर हे १३ डिसेंबर २०१३ रोजी चालक शरजिखान जहानखान यांच्यासह बस क्रमांक (एमएच४०एन ९९४५) पुणे ते खामगाव या पल्ल्याची बस घेऊन शिवाजीनगर बस स्थानकाहुन निघाले होते. दरम्यान सागर मांजरे हा औरंगाबादला जाण्यासाठी बसमध्ये बसला. पहाटे तीन वाजेच्या सुमारास बस नगर-औरंगाबाद रोडने कायगाव नदी पुलावर पोहचली असताना सागर याने चालकास बस थांबविण्यास सांगितले. मात्र चालक बस थांबवत नसल्याने त्याने त्याच्याकडील चाकु काढून त्यांच्या गळ्याला लावला. यावेळी चालकाने प्रतिकार केला असता त्याने त्यांच्या बरगडीवर चाकू मारून जखमी केले. यावेळी बसमधील प्रवाशांच्या मदतीने वाहक किशोर यांनी त्याच्याकडील चाकू काढून घेतला. सदरील प्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात सागर मांजरे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीसांंनी गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले. सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे एकूण सहा साक्षीदार तपासण्यात आले. त्यात किशोर तेलकर यांची साक्ष महत्वाची ठरली. न्यायाधीश एम मोहिद्दीन शेख एम ए यांनी प्रकरणाचा निकाल देत आरोपी सागर मांजरे यास कलम ३५३ अन्वये तीन वर्षांची साधी सजा व ५ हजार रुपये दंड भरल्यास एक महिन्याची साधी सजा तर कलम ३२३ अन्वये एक वर्षाची साधी सजा ५०० रुपये दंड व दंड न भरल्यास १५ दिवस साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे बाळासाहेब महेर यांनी कामकाज पाहिले तर पैरवी अधिकारी म्हणून वाळूज पोलीस ठाण्याचे कोलमी यांनी त्यांना सहकार्य केले.