प्रतिनिधि वैजापूर भारती कदम
वैजापूर-शहरातील स्टेशन रोडवरील शोरूम फोडून मोटार सायकल चोरी करणाऱ्या चोरट्यांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या.या टोळीतील सहा पैकी दोन जणांना पोलिसांनी गजाआड केले.विनायक ज्ञानेश्वर वामन (२७) रा.वाटुळफाटा ता.परतूर व निलेश कौतीक भामरे देवळा ता.सटाणा अशी आरोपींची नावे आहेत.त्यांना येथील न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
शहरातील दुचाकीचे लखानी शोरूम फोडून चोरट्यांनी नवीन दुचाकी लंपास केल्या होत्या.विशेष म्हणजे एका महिन्यात हे शोरूम चोरट्यांनी दोनदा फोडून पाच मोटार सायकल लंपास केल्या होत्या.त्यामुळे पोलीस यंत्रणे समोर आव्हान निर्माण झाले होते.पोलीस निरीक्षक सम्राट राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांनी वामन यास मुकुंदवाडी औरंगाबाद येथून ताब्यात घेतले.तर दुसरा आरोपी भामरे यांस सटाणा येथून ताब्यात घेतले.त्यांच्या ताब्यातून तीन चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.भामरे याचा सटाणा येथे हाॅटेल व्यवसाय असून तो चोरीची वाहने खरेदी व विक्री करतो.वैजापूर चोरीच्या घटनेत सहा जणांच्या टोळीचा समावेश आहे.त्यातील दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.या टोळीकडून वाहन चोरीचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.