Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

६ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत




प्रतिनिधि वैजापूर भारती कदम

    वैजापूर - गस्ती पथकाच्या वाहनाला कट मारून पळणा-या वाळू तस्करी करणारा ट्रक्टर अर्धा किमी अंतर पाठलाग करून वैजापूर पोलिसांनी पकडले. मात्र या चालकाने "माझे ट्रक्टर  तुम्ही माझ्या घरी आणून देशाल" अशी दमबाजी करत पथकाला गुंगारा देत फरार झाल्याची घटना तालुक्यातील जळगाव शिवारात मंगळवारी रात्री घडली. पथकाने अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रक्टर व ट्राली एक ब्रास वाळू असा ६ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. दरम्यान या तस्कराच्या दहशतीमुळे छापा मारण्यासाठी खाजगी वाहन देण्यास तसेच सोबत पंच म्हणूनही कोणी जाण्यास तयार नव्हते. वाळू तस्कर कोणाच्या जीवावर एवढी दहशत निर्माण करत आहे हा प्रश्न उपस्थित होत आहे. 

संतोष भागीरथ काहीटे (रा.शंकरपूर ता.गंगापूर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या फरार वाळू तस्कराचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि, मंगळवारी रात्री सहायक फौजदार हुकूमसिंग डांगर हे उपनिरीक्षक रमेश जाधवर, योगेश झाल्टे, गणेश पैठणकर, अमोल मोरे यांच्यासह लासुरगाव परिसरात गस्तीवर होते. त्यावेळी रात्री ११ वाजेला त्यांना जळगाव शिवारातील शिवना नदीतून संतोष काहीटे हा त्याच्या विना क्रमांकाच्या ट्रक्टर  वाळू वाहतूक करत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने शिवना नदी गाठली. त्यावेळी नदीपात्रातून जळगाव, लासुरगावच्या दिशेने  येणा-या विना क्रमांकाचा न्यू व्होल्ड ट्रक्टरला पथकाने थांबण्याचा इशारा दिला. मात्र चालकाने ट्रक्टर

भरधाव आणून पथकाच्या वाहनाला कट मारून सुसाट निघून गेला. पथकाने या ट्रक्टरचा अर्धा किमी अंतर पाठलाग करून तो पकडला. त्यावेळी ट्रक्टर चालकाने अरेरावी करत, " माझे ट्रक्टर  कसे काय अडविले" अशी म्हणत नाव गाव सांगण्यास नकार दिला. त्यानंतर आपले नाव " संतोष काहीटे असे आहे, काय करायचे करून घ्या. माझे ट्रक्टर तुम्ही माझ्या घरी आणून देशाल" असे धमकावत वाहन सोडून पळून गेला. पथकाने ट्रक्टर ,ट्राली व एक ब्रास वाळू असा ६ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी हुकूमसिंग डांगर यांच्या फिर्यादीवरून संतोष काहीटे याच्यावर चोरी, गौण खनिज कायद्यासह मोटर वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.