प्रतिनिधि वैजापूर भारती कदम
वैजापूर येथील मृदु व जलसंधारण विभागाचे उप अभियंता हे कार्यालयात नेहमी गैरहजर राहत असल्याने शेतकऱ्यांची कामे होत नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी सवंदगाव (ता. वैजापूर) येथील शेतकरी निवृत्ती सोनवणे यांनी मागील दोन दिवसांपासुन उपविभागिय अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु केले आहे. बुधवारी त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस होता. त्यामुळे त्यांची प्रकृती बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. स्थानिक स्तर मृदु व जलसंधारण विभागाचे उप अभियंता हे कार्यालयात उपस्थित नसतात. त्यामुळे शेतकऱ्यांची अनेक कामे अडली आहेत. त्यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी सोनवणे यांनी हे उपोषण सुरु केले. उपविभागिय अधिकारी माणिक आहेर यांनी याबाबत स्थानिक स्तर विभागाच्या अभियंत्यास पत्र देऊन कार्यवाही करण्याचे निर्देश दिले व हे पत्र उपोषणकर्त्यास देऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली.
मात्र जोपर्यंत संबंधित अधिकारी कार्यालयात हजर होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही अशी भुमीका सोनवणे यांनी घेतल्याने त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस उजाडला आहे. दरम्यान याबाबत स्थानिक स्तर विभागाचे उप अभियंता देशमुख यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी आरोपांचे खंडन करत आपण नेहमीच कार्यालयात हजर राहत असल्याचे सांगितले. तसेच मंगळवाळी औरंगाबादेत जलशक्तीची बैठक असल्याने आपण वैजापूर येथे येऊ शकणार नसल्याचे स्पष्ट केले. दरम्यान चिंचडगाव येथील काही शेतकऱ्यांनीही उप अभियंता यांच्या गैरहजरीची तक्रार करत सोनवणे यांनी सुरु केलेल्या उपोषणाला पाठिंबा दर्शवला आहे.