प्रतिनिधि वैजापूर भारती कदम
वैजापूर .पंचायत समितीतर्फे शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या वैयक्तिक लाभाच्या व सार्वजनिक हिताच्या योजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करुन लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळवुन द्यावा अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या तालुका शाखेतर्फे करण्यात आली. अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणा व खादाड प्रवृत्तींमुळे सध्या पंचायत समितीत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार वाढला असुन खरे लाभार्थी लाभापासून वंचित राहत आहेत असा आरोप भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. भाजपाच्या राज्य कार्यकारिणीचे सदस्य एकनाथ जाधव यांच्या नेतृत्वाखाली तालुकाध्यक्ष कल्याण दांगोडे, डॉ. राजीव डोंगरे, कैलास पवार, ज्ञानेश्वर जगताप, दशरथ बनकर, प्रभाकर गुंजाळ यांच्या शिष्टमंडळाने गटविकास अधिकारी ज्ञानोबा मोकाटे यांची भेट घेऊन निवेदन दिले. एमआरईजीएस योजनेअंतर्गत गाय गोठे योजनेत चार हजार अर्ज दाखल असुन आजपर्यंत एकही अर्ज मंजुर नाही.
वैयक्तिक लाभाच्या शेततळ्यांचे अर्ज धुळखात पडून आहेत. वैयक्तिक विहिरी मंजुर करतांना प्राधान्य डावलले जाते. मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद रस्ते योजनेत केंद्राचा निधी उपलब्ध असुनही मंजुरी दिली जात नाही. रमाई योजनेअंतर्गत वर्क कोड मॅपिंग चुकल्यामुळे हजारो लाभार्थ्यांचे प्रत्येकी अठराशे रुपये येणे बाकी आहे असे निवेदनात म्हंटले असुन कार्यवाही न झाल्यास भाजपातर्फे पंचायत समिती कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.