वैजापूर तालुक्यातील महालगावसह शिर्डी येथून दुचाकी लांबविणा-या भामट्याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. जप्त केलेल्या दुचाकीसह चोरटा व स्थानिक गुन्हे शाखेचे पथक. |
वैजापूर, तालुक्यातील महालगाव येथील बसस्थानकावरून दुचाकी चोरणाऱ्या भामट्याच्य्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या आवळल्या आहेत. त्याने शिर्डी येथूनही आणखी एक दुचाकी चोरल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी या भामट्याकडून दोन दुचाकी हस्तगत करून त्याला वीरगाव पोलिसांच्या हवाली केले आहे. अन्सार मन्सूर शेख रा. चांदेकसारी ता. कोपरगाव असे या पकडलेल्या भामट्याचे नाव आहे. कोपरगाव येथील संतोष मराठे यांनी तालुक्यातील महालगाव येथे चहा पिण्यासाठी थांबले असता त्यांची एचएफ डिलक्स दुचाकी ( क्रमांक एमएच 17 बीसी 4213 ) चोरट्याने चोरून नेल्याची घटना 2 मार्च रोजी घडली होती. याप्रकरणी वीरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान औरंगाबाद येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीच्याआधारे शहरालगतच्या गंगापूर चौफुलीवर सापळा रचून अन्सार शेख याला पकडले. पोलिसांनी त्याला खाक्या दाखविताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. याशिवाय आपण शिर्डी येथून होंडा शाईन कंपनींची विनाक्रमांकाची आणखी एक दुचाकी चोरल्याची कबुलीही त्याने पोलिसांना दिली. पोलिसांनी दोन्हीही दुचाकी हस्तगत करून त्याला अटक करून वीरगाव पोलिसांच्या स्वाधीन केले. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे फौजदार विजय जाधव, प्रदीप ठुबे, विठ्ठल राख, दीपेश नागझरे, वाल्मिक निकम, गणेश गांगवे, ज्ञानेश्वर मेटे, संजय तांदळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.