प्रतिनिधि वैजापूर भारती कदम
वैजापूर - एका शेतकऱ्यावर चाकु व विटाने हल्ला चढवून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना तालुक्यातील भऊर येथे गुरुवारी रात्री घडली.या घटनेत साहेबराव पंढरीनाथ जगताप (५२) हे गंभीर जखमी झाले.या प्रकरणी सहा जणांविरुद्ध पोलीसात गून्हा दाखल करण्यात आला आहे.हल्ल्या मागील कारण मात्र समजू शकले नाही.
साहेबराव जगताप हे भऊर शिवारातील त्यांच्या गट नंबर १३६ मधील शेतात पिकाला पाणी भरत होते.त्यावेळी रात्री ७.३० वाजेच्या सुमारास दोन मोटार सायकल वर सहा जण तेथे आले.आम्हाला बाटलीत पाणी द्या.अशी मागणी त्यांनी जगताप यांच्याकडे केली.त्यावर येथे बाटली नाही असे जगताप यांनी त्यांना सांगितले.त्यानंतर सर्व जण मोटार सायकलच्या खाली उतरले. त्यांनी लगेच जगताप यांच्यावर चाकूने वार करण्यास सुरुवात केली.तसेच पडलेल्या विटाने व लाथाबुक्क्यांनी त्यांना गंभीर जखमी करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला.जगताप यांनी आरडाओरडा केल्याने परीसरातील शेतकरी व त्यांचा मुलगा तेथे आले.त्यामुळे हल्लेखोर तेथून पसार झाले.मात्र शेतकऱ्यांनी त्यांचा पाठीमागून पाठलाग करून तिन जणांना पकडले.त्यानंतर त्यांना पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले.जगताप मात्र तिघांना ओळखत नव्हते. जखमी साहेबराव जगताप यांच्या वर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.या प्रकरणी साहेबराव जगताप यांच्या फिर्यादीवरून सहा जणांविरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीसांनी राहुल अशोक खंडागळे, (२९) किरण रावसाहेब सावंत (३०),आकाश कैलास गजभिव (२१)या तिघांना अटक केली असून सर्व जण जोगेश्वरी आंबेडकर नगर वाळूज येथील रहिवासी आहेत.त्यांना येथील न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.पुढील तपास फौजदार ताहेर पटेल हे करीत आहेत