प्रतिनिधि वैजापूर भारती कदम
वीज बिलाची वसुली करुन जीपमध्ये ठेवलेली दोन लाख रुपयांची रक्कम लंपास केल्याची घटना सोमवारी महावितरण कार्यालयाच्या समोर घडली. याप्रकरणी पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महावितरण कंपनीच्या महालगाव शाखेत वरिष्ठ तंत्रज्ञ (वायरमन ) म्हणुन कार्यरत असलेले उद्धव उत्तम मोईन (रा. चोरवाघलगाव) हे तालुक्यातील भगूर, एकोडीसागज, बल्लाळीसागज या गावांची वीज बिलाची वसुली व दुरुस्तीचे काम करतात. त्यांनी या गावातुन १५ व १६ जानेवारी या दोन दिवसांत शेतकऱ्यांची शेतीपंपाच्या थकित वीज बिलाची वसुली केली होती.
वसुली केलेली एक लाख ९७ हजार साठ रुपयांची रक्कम जीपमध्ये (क्रमांक एमएच २० एफजी ८७१८) घेऊन ते वैजापूर येथील विश्वकल्याण पतसंस्थेमध्ये भरण्यासाठी आले होते. मात्र पतसंस्थेत पैसे भरण्याचे सर्वर डाऊन असल्याने ते पैसे घेऊन महावितरणच्या कार्यालयात गेले. स्टेशन रस्त्यावर महावितरणच्या गेटसमोर गाडी पार्क करुन गाडीच्या डॅशबोर्ड मध्ये रक्कम ठेवली. त्यानंतर थोडा वेळ कार्यालयात थांबुन मित्रांसोबत चहा पिण्यासाठी गेले. ही संधी साधत चोरट्याने गाडीची काच फोडुन रक्कम लंपास केली अशी तक्रार मोईन यांनी पोलिसांत दिली. त्यावरुन अज्ञात व्यक्तीविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.