प्रतिनिधि वैजापूर भारती कदम
वैजापूर -
संजय गांधी निराधार योजना समितीच्या बूधवारी झालेल्या बैठकीत श्रावण बाळ योजनेचे २ हजार १७१ तर संजय गांधी योजनेचे ५१८ अशा विक्रमी एकूण २ हजार ६८९ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. तर श्रावण बाळ योजनेचे १ हजार १६८ व संजय गांधी योजनेच्या ४०१ प्रस्तावात त्रुटी आढळून आल्या. राज्य व केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानासाठी प्रस्ताव दाखल केलेल्या शहर व ग्रामीण भागातील निराधारांचे समितीच्या बैठकीकडे लक्ष लागून होते. समितीची यापूर्वी जुलै २०२० मध्ये बैठक झाली होती. त्यानंतर दीड वर्षात समितीची बैठक झालेली नव्हती.
येथील तहसिल कार्यालयातील संजय गांधी निराधार योजना विभागाकडे गेल्या दीड वर्षापासून संजय गांधी व श्रावण बाळ निराधार अनुदान योजनेसाठी प्राप्त प्रस्ताव मंजुरीच्या प्रतिक्षेत पडून होते.
अशासकीय सदस्यांची तालुकास्तरीय समिती नसल्याने बैठका झालेल्या नाही. शासनाने अशासकीय सदस्य नियुक्त नसल्यास तहसिलदारानी समितीतील शासकीय अधिका-यांच्या उपस्थितीत बैठक घेवून प्रकरणे निकाली काढण्याचे धोरण आखून दिले आहे. त्यानुसार बुधवारी तहसीलदार राहुल गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय सदस्यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पालिकेचे मुख्याधिकारी भागवत बिघोत, समितीचे सदस्य सचिव तथा संजय गांधी निराधार योजनेचे नायब तहसिलदार नारखेडे, गटविकास अधिकारी यांचे प्रतिनिधी म्हणून एच.आर.बोयनर उपस्थित होते. संजय गांधीचे अव्वल कारकून जितेंद्र जाधव, गोसावी, जालिंदर वाघ, पठाण यांनी त्यांना सहकार्य केले. या बैठकीत संजय गांधी निराधार विभागाने ३० नोव्हेंबर २०२१ या तारखेपर्यंत प्राप्त प्रस्ताव चर्चेसाठी ठेवले होते. यात श्रावण बाळ योजनेत प्राप्त एकूण ३ हजार ३३९ प्रस्तावापैकी २ हजार १७१ प्रकरणे मंजूर करण्यात आली आहे. तर १ हजार १६८ प्रस्तावात त्रुटी आढळून आली. शिवाय संजय गांधी निराधार योजनेत ९१९ प्रस्ताव प्राप्त झाले होते. यातील पात्र ५१८ प्रस्ताव मंजूर झाले आहे. तर ४०१ प्रस्तावात त्रुटी दिसून आल्या. दोन्ही योजनेतील त्रुटी आढळून आलेले प्रस्ताव नामंजूर न करता लाभार्थ्यांकडून कागदपत्रांची पूर्तता करवून ती पुन्हा चर्चेसाठी ठेवली जाणार आहे. बैठकीत मंजूरी मिळालेल्या सर्व प्रस्तावांचे त्या-त्या गावातील ग्रामसभेत चावडी वाचन करण्यात येईल. यात पात्र प्रस्तावाबाबत कोणाची आक्षेप व हरकती प्राप्त न झाल्यास त्यानंतरच संबंधित लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ सुरु केला जाणार आहे. संजय गांधी निराधार योजनेत प्रस्ताव मंजूर झालेल्यांत विधवा २७६, दिव्यांग १७०, परितक्त्या ४६, दुर्धर रुग्ण २१, अनाथ ३ व निराधार २ अशा एकूण ५१८ जणांचा समावेश आहे.