प्रतिनिधि वैजापूर भारती कदम
वैजापूर शहरासह ग्रामीण भागात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, गुरुवारी तालुक्यात २३ करोनाचे रुग्ण आढळून आल्यामुळे आरोग्य यंत्रणा हादरली आहे. एकाच दिवशी शहरात १५ आणि ग्रामीण भागात ८ बाधीत रुग्ण संख्येचा समावेश असल्याने स्थानिक प्रशासनाने तालुक्यात करोना निर्बंधाची कठोर अंमलबजावणी करण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे.
उपविभागीय अधिकारी कार्यालयात तालुका टास्क फोर्स नियंत्रण समितीची बैठक संपन्न झाली. या बैठकीला आमदार रमेश बोरनारे, डॉ.दिनेश परदेशी यांची प्रमुख उपस्थिती होती.उपविभागीय अधिकारी माणिक आहेर यांनी करोना संसर्गाचे वाढते संक्रमण लक्षात घेता अधिका-यांनी सोशल मिडीयात संपर्क ग्रुपवर संदेश पाठवण्या सोबत परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी क्षेत्रावर सक्रीय राहण्यास सांगितले. तहसीलदार, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना जमावबंदी व संचारबंदी आदेशाचे सक्तीने पालन करण्याचे आदेश त्यांनी दिले.
आरोग्य विभागाकडून करोना बाधीत रुग्णाला गृहविलगीकरणाची मुभा देण्यात आलेली आहे. या रुग्णांकडून दहा दिवस सार्वजनिक ठिकाणी संचार करणार नाही असे स्पष्ट लेखी हमी पत्र लिहून घेण्याची कारवाई करुन घ्या अशी सूचना त्यांनी वैद्यकीय अधिका-यांना केली. बाधित रुग्ण मुक्तपणे फिरल्यास उपाययोजना निरुपयोगी ठरतील असे उपविभागीय अधिकारी आहेर यांनी सांगितले. या बैठकीस तहसीलदार राहूल गायकवाड, गटविकास अधिकारी डॉ.ज्ञानोबा मोकाटे,पालिकेचे मुख्याधिकारी बी.यु.बिघोत , तालुका आरोग्य अधिकारी गुरुनाथ इंदुलकर, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ.आशिष पाटणी, गटशिक्षणाधिकारी मनीष दिवेकर, भाऊसाहेब गलांडे, पंचायत समिती सदस्य मयूर राजपूत, रविंद्र कसबे, विनायक गाढे, आरोग्य विभागाचे कैलास अनर्थे, अव्वल कारकून दिपक त्रिभुवन, पारस पेटारे, प्रदीप सांळुके, ज्ञानेश्वर शिरसाठ यांची उपस्थिती होती.
लसीअभावी केंद्र बंद डॉ.दिनेश परदेशी
आरोग्य विभागाकडून कोव्हँक्सिन लस साठा प्राप्त होत नसल्याने पालिकेचे लसीकरण केंद्राचे काम दहा दिवसापासून बंद पडले आहे. १५ ते १८ वर्ष वयोगटातील १८ हजार बालकांना कोव्हँक्सिन लसमात्रा देण्याचे निर्देश देण्यात आले मात्र अभूतपूर्व लसटंचाईमुळे अवघ्या ५ हजार ८९२ मुलांना लसीकरण टप्पा येथे पूर्ण झाला.अद्याप बारा हजार विद्यार्थी कोव्हँक्सिन लससाठा केव्हा उपलब्ध होईल या प्रतिक्षेत असल्याचे परदेशी यांनी सांगितले. शहर व परिसरात सार्वजनिक कार्यक्रमात वाढती गर्दीवर बोलताना त्यांनी चिंता व्यक्त केली.
शहरात बाधित रुग्ण संख्येचा आलेख वाढला
वैजापूर तालुक्यात करोना संसर्गाच्या लाटेत एकूण ६८ बाधीत रुग्ण संख्या आहे यापैकी सात रुग्ण उपजिल्हा रुग्णालयातील कोविड केंद्रात उपचार घेत आहेत.उर्वरित ६१ रुग्ण घरीच गृहविलगीकरणात आहेत. शहर परिसरात रुग्ण संख्येचे प्रमाण अधिक लक्षवेधक आहे.पालिका हद्द क्षेत्रात एकूण ४७ व ग्रामीण क्षेत्रातील लोणी खुर्द, निमगाव, वाकला, टुणकी, चिकटगांव आदी गावात २१ रुग्ण असून रुग्ण संख्येचा आलेख वाढला आहे.