अहमदनगर प्रतिनिधी :
श्री साईबाबा संस्थान विश्वस्थव्यवस्था, शिर्डीच्या वतीने दरवर्षी प्रकाशित करण्यात येणारे “श्री साईबाबा दैनंदिनी व दिनदर्शिका २०२२" चे प्रकाशन सोहळा आज दिनांक १४ जानेवारी रोजी मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर संस्थानचे अध्यक्ष आ. आशुतोष काळे, मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायात व विश्वस्त मंडळाचे सदस्य यांच्या उपस्थित पार पडला. आज दिनांक १४ जानेवारी रोजी सकाळी ११.०० वाजता श्री साई सभागृहात पार पडलेल्या या प्रकाशन सोहळ्यास संस्थानचे अध्यक्ष आ. आशुतोष काळे, संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत, विश्वस्त सर्वश्री श्रीमती अनुराधाताई आदिक, अॅड. सुहास आहेर, अविनाश दंडवते, सचिन गुजर, सुरेश वाबळे, महेंद्र शेळके, डॉ. एकनाथ गोंदकर, संस्थानचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, प्रशासकीय अधिकारी डॉ. आकाश किसवे, प्रकाशने विभाग प्रमुख विश्वनाथ बजाज व कर्मचारी उपस्थित होते.
याप्रसंगी संस्थानचे अध्यक्ष आ. आशुतोष काळे म्हणाले की, संस्थान व्यवस्थापनामार्फत दरवर्षी श्री साईबाबा दैनंदिनी व दिनदर्शिका प्रकाशित करणेत येतात. या विविध प्रकारच्या दैनंदिनी व दिनदर्शिका साईभक्तांना सशुल्क उपलब्ध करुन दिल्या जातात. त्यानुसार यावर्षी सन २०२२ करीता श्री साईबाबा दैनंदिनी ०२ प्रकारात व ०४ भाषेत (मराठी, हिंदी, इंग्रजी व तेलगू) स्वतंत्र्यरित्या प्रकाशित करणेत आलेली आहे. या दैनंदिनीत श्री साईबाबा समाधी मंदिर व मंदिर परिसरातील विविध मंदिरे आणि महत्वाच्या स्थानांची सविस्तर माहिती नमुद करण्यात आलेली असून या प्रत्येक स्थानांच्या माहिती समवेत एकुण QR CODE देणेत आलेले आहेत. सदरचे QR CODE SCAN केले असता, संबंधित स्थानांची अथवा विभागाची माहिती विविध छायाचित्रांसह दृकश्राव्य पध्दतीने (Video Clip व्दारे) उपलब्ध होते. तसेच याव्यतिरिक्त संस्थानमार्फत साजरे होणारे सर्व उत्सव, धार्मिक व इतर कार्यक्रमांची सविस्तर माहिती, संस्थान प्रकाशित पुस्तके / फोटो, ऑनलाईन देणगी, निवासस्थाने व दर्शन आणि नोंदणी करणे बाबत महत्वपुर्ण अशी माहितीचा समावेश करण्यात आलेला असुन दैनंदिनी ही मोठी व पॉकेट या आकारात प्रकाशित करणेत आलेले आहे. तसेच श्री साई दिनदर्शिका विविध ०९ प्रकारात प्रसिध्द करणेत आलेली असून यामध्ये दिनदर्शिका ही साधे व थ्रीडी स्वरुपात, टेबल कॅलेंडर्स साधे व थ्रीडी स्वरुपात तर ऑफिस व होम कॅलेंडर्स असे प्रकाशित करणेत आलेले आहेत.
अशाप्रकारे प्रकाशन साहित्य साईभक्तांना माफक दरात विक्री करण्यात येणार असून सदरची दैनंदिनी ही संस्थानचे पुस्तके व फोटो विक्री केंद्रावर तसेच संस्थानच्या www.sai.org.in या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन विक्री करीता लवकरच मुबलक प्रमाणात पुरवठ्यानुसार उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचे सांगुन जास्तीत जास्त साईभक्तांनी संस्थानच्या या प्रकाशन साहित्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन ही संस्थानचे अध्यक्ष आ. आशुतोष काळे यांनी केले आहे.