प्रतिनिधि वैजापूर भारती कदम
वैजापूर तालुक्यातील वीरगाव शिवारातील सरकारी जमीनीतुन विनापरवाना मुरुमाचा उपसा केल्याप्रकरणी पकडण्यात आलेली वाहने कुठलीही कारवाई न करता सोडून देण्यात आली आहे.ग्रामपंचायत च्या विकास कामांसाठी हा मुरुम उपसा करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. उपविभागिय अधिकारी माणिक आहेर यांनी छापा टाकुन पाच ट्रॅक्टर, ट्रॉली व एक जेसीबी मशीन आठ दिवसांपुर्वी पकडले होते.ही वाहने ताब्यात घेऊन त्यांचेवर कारवाई करण्याचे आदेश तहसिलदार यांना दिले होते.मात्र तहसिल कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी कुठलीही स्थळ पाहणी अथवा पंचनामा न करता ही वाहने सोडून दिली. या प्रकरणात महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियमाचे उल्लंघन झाले का याबाबत सखोल चौकशी करुन कार्यवाही करण्याचे आदेश होते. वीरगाव मुर्शदपुर शिवारातील गट क्रमांक २७ मधील गायरान जमीनीतुन हा बेकायदा मुरुमाचा उपसा होत असल्याची माहिती उपविभागिय अधिकारी माणिक आहेर यांना मिळाली होती.
पथकाने रविवारी रात्रीच्या सुमारास त्या ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी एक जेसीबी यंत्र व पाच ट्रॅक्टरच्या सहाय्याने संभाजी डहाके (वीरगाव), यशवंत फडे (शिरसगाव), शिवम थोरात (वीरगाव), अनिकेत लवांडे (डागपिंपळगाव) हे गायरान जमीनीतुन बेकायदा मुरुमाचा उपसा करतांना आढळुन आले. हे जेसीबी यंत्र अमोल खिल्लारे यांच्या मालकीचे असल्याचे सांगण्यात आले. ही वाहने सोडून दिल्याने नागरीकांत चर्चेला उधाण आले आहे. या गायरान जमीनीतून मोठ्या प्रमाणावर मुरुमाचा उपसा करण्यात आला आहे.हा मुरुम ग्रामपंचायत कामालाच जात होता.की त्याची चोरून विक्री होत होती.याची शहानिशा व पंचनामा महसूल अधिकारी यांनी करणे गरजेचे होते. त्यातून किती ब्रास वाळू उपसा झाला हे निश्चीत झाले असते.
परंतू अधिकारी यांनी चौकशी न करताच वाहने सोडल्याचे बोलले जाते.शासकीय कामे करत असतांना ठेकेदारांच्या बिलातून गौण खनिजांची राॅयल्टी कपात करण्यात येते. हा मुरूम ग्रामपंचायत कामाला जात होता तर ही कारवाई केलीच कशाला हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.त्यामुळे विनाकारण पकडलेल्या वाहनधारकांची ही बदनामी झाली आहे.