वैजापूर
वैजापूर तालुक्यातील गोदावरी व शिवना नदीच्या घाटातुन वाळू तस्करांकडून मोठ्या प्रमाणावर वाळुचा उपसा सुरू आहे. कोणत्याही वाळुघाटाचा लिलाव झाला नसतांना रात्रीच्या वेळी घाटातुन वाळुचा उपसा करुन बेकायदेशीरपणे वाळुची वाहतुक होत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. नदीकाठच्या गावात अवैध वाळू उत्खनन आणि वाहतूकीचा सुळसुळाट मोठया प्रमाणात वाढला आहे.स्थानिक महसूल व पोलीस प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे वाळु तस्कर शासनाला कुठलीही रॉयल्टी न भरता वाळु लंपास करत असल्याचे गावकरी सांगतात. त्यामुळे शासनाच्या तिजोरीला फटका बसत आहे.
नदी पात्राजवळील ठिकाणाहून अवैध वाळू उपसा करण्यासाठी महसूल व पोलीस अधिकाऱ्यांकडून परवानगी नसतांना वाळुचे उत्खनन होत आहे. त्यामुळे वाळूचोरांचे चांगलेच फावत आहे. गोदापात्रातील बहुतांश वाळूपट्टे वीरगाव पोलीसांच्या हद्दीत येत असून या पट्ट्यात महसूल विभागापेक्षा पोलीस प्रशासन जास्त सक्रिय आहे. गेल्या काही दिवसांपासून तालुक्यातील अव्वलगाव, बाभूळगावगंगा, नागमठाण, नांदूरढोक, डोणगाव आदी गोदापात्रातील वाळूपट्ट्यातुन वाळुचोरांंनी रात्रंदिवस वाळूचा बेसुमार उपसा करत पात्रात धुडगूस घातला आहे. वाळू चोरट्यांनी सध्या तरी गोदावरी पात्रावर कब्जा मिळवला आहे. वाळू उपसा करणारे ग्रामस्थांचा विरोधही जुमानायला तयार नाहीत. बरकतीच्या समजल्या जाणाऱ्या या व्यवसायात आता सर्वसामान्यांनी ही उडी घेतली आहे.
उपविभागीय अधिका-याकडून कारवाईचे संकेत
गोदावरी नदी पात्रा शेजारील अव्वलगाव येथे मोठया प्रमाणात वाळु साठे केल्याची तक्रार महसूल विभागाला प्राप्त झाली आहे.या तक्रारीनुसार अवैध वाळु साठा करणा-या लोकांवर कारवाई करण्याचे संकेत उपविभागीय अधिकारी माणिक आहेर यांनी दिले आहेत.
आधुनिक यंत्राद्वारे होतोय वाळूचा उपसा
नदीपात्रात सध्या बऱ्यापैकी पाणी आहे. मात्र वाळू चोरट्यांनी शक्कल लढवून आधुनिक यंत्राद्वारे नदीपात्रातुन दिवस रात्र बेफाम वाळू उपसा सुरू केला आहे. याप्रकरणी जिल्हाधिकारी यांनीच लक्ष देऊन कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.