वैजापूर
वैजापूर शहर व तालुक्याच्या ग्रामीण भागातील वाढत्या करोना रुग्णांच्या पार्श्वभुमीवर करोना प्रतिबंधक लस अधिक गतिमान करा असे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घटणे यांनी दिले. जिल्हा कोव्हीड लसीकरणात मागे असल्याने गटणे यांच्यासह आरोग्य सभापती अविनाश गलांडे, जिल्हा आरोग्य अधिकारी सुधाकर शेळके, जिल्हा परिषद सदस्य पंकज ठोंबरे यांनी मंगळवारी लाडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. यावेळी वैजापूर व गंगापूर तालुक्यातील आरोग्य अधिकारी, जिल्हा सुकाणु समिती सदस्य, वैद्यकिय अधिकारी, आशा वर्कर, आरोग्य दुत, जिल्हा परिषद सदस्य व ग्रामपंचायत सदस्य यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीत करोंना स्थितीचा आढावा घेतल्यानंतर लसीकरण मोहिम अधिक गतीमान करण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करण्याच्या सुचना गटणे यांनी दिल्या.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कम्युनिटी अॅक्शन फॉर हेल्थ या अंतर्गत मराठवाडा ग्रामीण विकास संस्था यांनी या बैठकीचे आयोजन केले होते. लाडगाव आरोग्य केंद्रांतर्गत एकुण ३७ गावे असुन ४७ हजार ५२३ नागरिकांचे लसीकरण करतांना ३६ हजार १७५ नागरिकांनी पहिला व १७ हजार ३३१ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. अजुन बरेच नागरिक विना डोसचे आहेत. त्यांच्यासाठी व शालेय विद्यार्थ्यांसाठी नियोजन करुन विद्यार्थी व उर्वरित नागरिकांना तातडीने लसीकरण करा असे निर्देश त्यांनी दिले. यावेळी मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेचे सचिव आप्पासाहेब उगले, अन्नपुर्णा ढोरे, जिल्हा आरोग्य समिती सदस्य धोंडिरामसिंह राजपूत, बापु वाळके, राधाकृष्ण गुजर, नारायण भोपळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गुरुनाथ इंदुलकर, गंगापूर तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. पी.एन. बढे, वैद्यकिय अधिकारी डॉ. वृषाली हजारी, ऋतुराज सोमवंशी व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. याच बैठकीत मूख्य कार्यकारी अधिकारी यांनी ग्रामीण विकास संस्थेच्या सामाजिक कृती प्रक्रिया बैठकीतील विविध विषयांवर चर्चा करुन सादर केलेल्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करु असे आश्वासन दिले. येत्या दोन तीन दिवसात कोव्हॅसीन लस उपलब्ध होईल अशी माहिती त्यांनी दिली.