प्रतिनिधि वैजापूर भारती कदम
पक्षविरोधी कृत्य तसेच विविध बैठकांमध्ये वादग्रस्त भूमिका मांडणाऱ्या वैजापूर येथील संजय निकम यांना पक्षातून निलंबित करण्याची शिफारस शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी पक्षाचे सचिव अनिल देसाई यांच्याकडे केली आहे. वैजापूरच्या स्थानिक पदाधिका-यांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने आ.दानवे यांनी ही मागणी पक्ष नेतृत्वाकडे केली आहे. शिवसेनेचे सचिव अनिल देसाई यांना उद्देशून दिलेल्या पत्रात म्हटले आहे कि, संजय निकम (रा. टुणकी ता. वैजापूर) हे सातत्याने वैजापूर तालुक्यातील लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांच्याविषयी पक्षविरोधी कृत्य करत आहे. निकम हे पक्षाची बदनामी होईल असे वृत्तपत्रात जाणूनबुजून माहिती पुरवणे व पक्षाच्या विविध बैठकीत वादग्रस्त भूमिका मांडत आहे.
या सदंर्भात वैजापूर तालुक्यातील सेनेचे उपजिल्हा प्रमुख बाबासाहेब जगताप, तालुकाप्रमुख सचिन वाणी व शहरप्रमुख राजेंद्र साळुंके यांनीही तक्रारी केल्या आहेत. त्या तक्रारीची दखल घेत पक्षशिस्त राहावी यासाठी संजय निकम यांना त्वरित शिवसेनेतून निलंबित करण्याची शिफारस आ. दानवे यांनी केली आहे. दरम्यान संजय निकम यांनी यापूर्वी पक्षाचे तालुकाप्रमुख म्हणून काम पाहिले आहे. त्यांनी सेना उमेदवारा विरोधात बंडखोरी करत विधानसभा निवडणूकही लढविली होती. त्यामुळे त्यांना पक्षातून बाजूला करण्यात आले होते. त्यानंतर ऑगस्ट २०१५ मध्ये पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत निकम सेनेत दाखल झाले होते.