धुळे प्रतिनिधी नरेंद्र माळी
धुळे - (दि.७ जाने) साक्री तालुक्यातील चीकसे येथील सिताराम तुळशीराम अहिरे यांच्या शेतातील कांदा चाळीत विक्रीसाठी तयार करून ठेवलेला ९० पोते सोयाबीन पर्वा रात्री अज्ञात चोरट्यांनी लांबवला. त्यामुळे शेतकरी अहिरे यांचे अंदाजे पाच ते साडेपाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
घटनेबद्दल अधिक माहिती अशी की, चिकसे-देगाव रस्त्यावर असलेल्या हिंगोटी शिवनाल्याजवळ सिताराम तुळशीराम अहिरे यांचे शेत व घर आहे. काही दिवसांपूर्वी ट्रॅक्टरच्या मळणी यंत्राने सोयाबीनची प्रती पोते अडिचशे रू. दराने मळणी करून तयार केलेला माल रिकाम्या कांदा चाळीत पोते भरून ठेवला होता. ६१ किलो प्रती पोतेप्रमाणे सर्वच ९० कट्टे (पोते) अज्ञात चोरट्यांनी वाहनाद्वारे रात्रीच्या अंधारात चोरून नेला. सोयाबीन पेरणी, कापणी व मळणी यावर सव्वा लाख ते दिड लाख रुपये खर्च करून आजच्या बाजारभावाप्रमाणे साडेतीन ते चार लाख रुपये किमतीचा सोयाबीन चोरी गेल्याने एकत्रित ५ ते साडेपाच लाख रुपये शेतकऱ्याचे लुटले गेल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.
देगाव रस्त्याला लागून असलेल्या सिताराम अहिरे या शेतकऱ्याच्या शेतातून मध्यरात्रीनंतर चोरट्यांनी सोयाबीन चोरून नेल्यानंतर पिंपळनेर पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक साळुंखे यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी ए. पी. आय. सचिन साळुंखे यांनी सांगितले की तपासाची चक्रे फिरवून चोरीचा लवकरच छडा लावू. शेतकरी प्रविण सूर्यवंशी, निवृत्ती अहिरे, विजय चौधरी, शिवाजी खैरनार, जितेश अहिरे आदी शेतकऱ्यांनी सांगितले की, पूर्वी पोलीस स्टेशनकडून आजूबाजूच्या गावांमध्ये रात्रीची गस्त सुरू होती तोपर्यंत चोरीच्या घटनांना आळा बसला होता. पोलिस व्हॅनची पुन्हा रात्रीची गस्त सुरू करावी अशी मागणी सदर शेतकऱ्यांनी यावेळी केली.
दरम्यान चिकसे परीसरातील देशशिरवाडे व बल्हाणे शिवारातूनही एक-दिड महिन्यांपूर्वी एका शेतकऱ्याच्या व व्यापाऱ्याच्या 'शेड'मधूनही सोयाबीन चोरीची घटना घडली होती. जेबापूरलासुद्धा एका शेतकऱ्याचा शेतमाल नुकताच चोरी झाला. विहिरीतून वीजपंप चोरीच्या घटनाही यापूर्वी चिकसे परीसरात घडल्या आहेत. दुचाकी चोरीच्या घटना तर नियमित सुरूच असतात. पोलिस स्टेशन कडून रात्रीची गस्त वाढवण्याची गरज निर्माण झाली आहे.