योगीराज गंगागिरी महाराज ११९ व्या पुण्यतिथी महोत्सव किर्तनातून महंत रामगिरी महाराजांचे प्रतिपादन .
श्री क्षेत्र सराला बेटावर भाविकांची मांडीयाळी, भाविकांनी घेतले सद्गुरु गंगागिरी महाराज समाधिचे दर्शन . वैजापूर-मनुष्य देह मिळाल्यानंतर या जन्माचे नेमके प्रयोजन काय आहे, हे प्रत्येकाला कळणे गरजेचे आहे. मृत्यूलोकात माणूस स्वार्थासाठी जागा आहे, पण आत्मकल्याणासाठी अज्ञानी आहे आणि लोकांचे हे अज्ञान दूर करण्याचे कार्य सद्गुरु गंगागिरी महाराज व संतानी सोप्या साध्या शब्दातील ग्रंथ विचारातून केले म्हणूनच संतांचे विचार आजही सुर्यासारखे प्रखर आहेत. या विचारांचे सर्वांकडून आचरण होणे हाच खरा परमार्थ आहे असे प्रतिपादन महंत रामगिरी महाराजांनी केले.
लाखो भाविकांचे श्रध्दास्थान सराला बेटाचे योगीराज सद्गुरु गंगागिरी महाराज यांच्या ११९ व्या पुण्यतिथी महोत्सवात गुरूचरित्रपर किर्तनातून संत तुकाराम महाराज यांच्या उपदेशपर प्रकरणातील ‘ब्रम्हरस गोडी तयासी फावली'वासना निमाली समूळ त्याची' अंभगाचे निरुपण महंत रामगिरी महाराजांनी केले. महाराज म्हणाले, माणसाने काही गोष्टी विचारल्या तर सांगाव्यात, काही गोष्टी विचारल्या तरी सांगू नयेत आणि काही गोष्टी नाही विचारल्या तरी सांगाव्यात हे तत्वज्ञान प्रत्येकाला कळावे यासाठी संत विचार आहेत. मृत्यूलोकात माणूस स्वार्थासाठी जागा,पण आत्मकल्याण, स्वहितासाठी तो अज्ञानी आहे आणि म्हणूनच जन्म-मरणाचा फेरा संपत नाही.
समाजातील लोकांचे अज्ञान दूर करण्याचे कार्य सर्व संतांनी केले. त्यासाठीच त्यांनी कोणी विचारले नाही तरी समाजाला त्यांच्या हितासाठी उपदेश केला. कारण अज्ञानी माणसाला उपदेश करण्याचा अधिकार संतांना होता. संतांनी केलेला उपदेश लोकांच्या भल्यासाठीच आहे, म्हणून संत विचार अंगीकारा, आचरणात आणा असे आवाहन कीर्तनातून रामगिरी महाराजांनी केले. महाराज म्हणाले, वेदात विश्वाला सामावून घेणारे ज्ञान आहे, परंतू वेदातील हे ज्ञान अज्ञानी समाजाला कळावे यासाठी श्रृती,स्मृती नंतर उपनिषेद त्यानंतर भगवतगितेत हे ज्ञान मनुष्यापर्यंत पोहचवण्यात आले त्याहीपुढे जावून संत ज्ञानेश्वर माऊलींनी भावार्थ दिपीका अर्थात ज्ञानेश्वरीतून हे ज्ञा सोप्या-साध्या भाषेतून समाजापुढे मांडले. जगाचये कशासाठी, आणि या जन्माचे प्रयोजन कोणते हे कळण्यासाठीचा मार्ग योगीराज गंगागिरी महाराजांनी समाजाला दाखवला म्हणूनच अंधकाराकडून प्रकाशाकडे नेण्याचे महत कार्य सर्व संतांनी केले आहे असे महाराज म्हणाले, भय, निद्रा आणि मैथून या चार गोष्टीपेक्षा मनुष्याकडे विशेष ज्ञान आहे त्याव्दारे मनुष्याला देवत्व प्राप्त होवू शकते हे ज्ञान संतांनी माणसाला दिले म्हणून जीवनाचे कल्याण करा, मनुष्य देह दुर्लभ आहे ते समजून घेण्याची आवश्यकता आहे. कीर्तन परंपरा समाजाला जगण्याची उर्मी देत आली आहे. ही परंपरा जोपासण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेण्याची गरज आहे असेही महाराज कीर्तनाच्या समारोपात म्हणाले.
बेटाच्या परंपरेने चालत आलेल्या आमटी - भाकरी महाप्रसादाच्या पंगती दिवसभर सुरू होत्या ,या कीर्तनाला केंद्रीय राज्य अर्थमंत्री डॉ.भागवत कराड, आमदार अंबादास दानवे, आमदार आशुतोष काळे, बाबासाहेब चिडे, सचिन जगताप, दत्ता खपके, गोविंद महाराज मलिक, संदीपान महाराज, बाळासाहेब रंजाळे, रामभाऊ महाराज, सराला बेटाचे विश्वस्त मधुकर महाराज आदीसह बहु संख्येने भाविकांची उपस्थिती होती