लासलगाव-
चांदवड तालुक्यातील तळेगाव रोही ग्रा. पं उपसरपंच व ग्रा.पं सदस्य यांनी पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी उपसरपंचा सह सहा ग्रामपंचायत सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. मालेगाव अप्पर जिल्हाधिकारी मायादेवी पाटोळे यांनी गुरुवारी (दि. 13 जानेवारी 2022 ) रोजी हा आदेश दिला आहे.
तक्रारदार अन्वर पठाण यांचा 2018 पासून याप्रकरणी पाठपुरावा सुरू होता. तळेगावरोही ग्रामपंचायती अंतर्गत दलितवस्ती सुधार योजना, ठक्करबाप्पा आदी योजनांतर्गत प्राप्त निधीतून कामे झाली. मात्र, या कामांच्या बिलांचे धनादेश थेट ग्रामपंचायत सदस्यांच्या नावाने काढले गेलेत, तर काही सदस्यांनी गावठाण जागेवर अतिक्रमण करीत सदनिका बांधल्या. जलवाहिनीच्या कामातही भ्रष्टाचार झाल्याचा आरोप पठाण यांनी केला होता. यासंदर्भातील पुरावे प्राप्त करत त्यांनी दोन वर्षांपूर्वी थेट जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार केली. त्यांनी चौकशीचे आदेश दिलेत. दरम्यानच्या काळात उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी चांदवड दौर्यात या ग्रामपंचायतीचे दप्तरही तपासले.
अखेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत झाली. परंतु, त्रोटक अहवाल देऊन वरिष्ठ कार्यालयाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाला. ही बाब निदर्शनास आल्यानंतर शिस्तभंग कार्यवाहीची तंबी मिळाल्यानंतर सुस्पष्ट अहवाल सादर झाल्याचे पठाण यांनी सांगितले. त्याआधारे अपर जिल्हाधिकारी, मालेगाव यांच्याकडे अपिल करण्यात आले. त्यावर दीड वर्ष सुनावणी चालली. त्यात सहा सदस्यांनी पदाचा गैरवापर केल्याचे स्पष्ट झाल्याने उपसरपंच बाबाजी गोविंद वाकचौरे, सौ. अर्चना सुनिल ठाकरे, निर्मला तुकाराम घुमरे, योगिता शरद कदम, , कांताबाई सुरेश भोकनळ यांना उर्वरित कालावधीसाठी अपात्र ठरविले आहे.
संबंधितांनी पदाचा गैरवापर केल्याचे स्पष्ट झाल्याने या गैरप्रकारातून झालेल्या भ्रष्टाचाराची वसुलीदेखील व्हायला हवी, सदरहू उपसरपंच व सदस्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावी अशी प्रतिक्रिया दै.करुण भारत प्रतिनिधी सोबत बोलतांना व्यक्त केली