Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

शेताचा बांध कोरण्याच्या कारणावरून दोन कुंटुबीयात तुंबळ हाणामारी



प्रतिनिधि वैजापूर भारती कदम

        शेताचा बांध कोरण्याच्या  कारणावरून दोन कुंटुबीयात तुंबळ हाणामारी झाली.  या हाणामारीत काठ्या, तलवार व कुऱ्हाडीने एकमेकांवर हल्ला करण्यात आला.ही घटना कांगोण  शिवारात शनिवारी घडली. या घटनेत दोन जण गंभीर जखमी झाले असून प्रकरणी दोन्ही गटाने दिलेल्या परस्परविरोधी तक्रारीवरून शस्त्र कायदा तसेच अन्य कलमान्वये ७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.         
        सुनिल बाळासाहेब थोरे (रा. पुरणगाव ) व सुमित कैलास ठोंबरे ( रा.कांगोनी ) असे तलवार व कुऱ्हाडीच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांची नावे आहेत. सुरेंद्र गुलाब मोटे, वैभव सुरेंद्र मोटे, कमाबाई मोटे, सुनिल बाळासाहेब थोरे, अनिल थोरे ( सर्व रा. कांगोनी शिवार ), कैलास दशरथ ठोंबरे व सुजित ठोंबरे ( दोघे रा. पुरणगाव ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. तालुक्यातील कांगोणी शिवारातील शेत गट क्र. ५६ मध्ये बाळासाहेब थोरे यांची शेतजमीन आहे. त्यांनी ही जमीन भाचा सुमित ठोंबरे यांना कांदा लागवडीसाठी बटाईने दिली आहे. शनिवारी दुपारी त्या ठिकाणी सुमित हा शेतातील काडी, गवत, कचरा काढत होता. तर ट्रक्टरचालक बापूसाहेब सांगळे हा रोटर मारत होता. त्यावेळी शेता शेजारीचे सुरेंद्र मोटे, वैभव व कमाबाई मोटे हे तिघे तेथे आले. हातात तलवार, कु-हाड व मोटरसायकलची चैन घेवून आलेल्या मोटे कुटुंबियांनी तू आमचा बांध का कोरतो, तू बटाईने केलेल्या शेतातील काडी, गवत बांधावर का टाकतो असे म्हणून सुमितला शिवीगाळ सुरु केली. शिवीगाळ करू नका असे म्हणताच सुरेंद्र मोटे याने सुमितच्या उजव्या हाताच्या दंडावर, मनगटावर तलवारीने वार केला. तर वैभवने त्याला  चापटबुक्क्यांनी मारहाण केली. त्यांच्या भांडणाचा आवाज ऐकून सुमितचा मेहुणा सुनील थोरे, मामा बाळासाहेब थोरे, अनिल थोरे व बापूसाहेब सांगळे तेथे जमा झाले. दोघांचे भांडण सोडवत असताना सुरेंद्रने अचानक सुनीलच्या डाव्या हातावर तलवारीने वार केला. 

        त्याचवेळी कमाबाई यांनी हातातील कुऱ्हाड सुनीलच्या डोक्यात मारल्याने तो रक्तबंबाळ झाला. तर अनिलला वैभव व सुरेंद्र मोटे यांनी चैनने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. गंभीर जखमी असलेल्या सुनील व सुजितला तत्काळ वैजापूर येथील खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले. या प्रकरणी सुमित ठोंबरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुरेंद्र मोटे, वैभव मोटे व कमाबाई मोटे यांच्यावर आर्म अँक्टचा गुन्हा दाखल करण्यात आला. तर याच प्रकरणात सुरेंद्र मोटे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की,  त्यांच्या शेतातील घरासमोर कुटुंबासह काम करत होते. त्यावेळी सुनील थोरे, अनिल थोरे, कैलास ठोंबरे, सुजित ठोंबरे यांनी येवून आमच्या बांधावर तुमच्या शेतातील दगड हे बांधावर का टाकता असे म्हणत शिवीगाळ करू लागले. शिवीगाळ करू नका असे म्हटल्यावर सुरेंद्रच्या हात व पाठीवर सुनील व कैलास यांनी काठीने मारहाण केली. त्यांची पत्नी कमलबाई यांना सुजित ठोंबरे याने दंडावर व मांडीवर मुक्कामार दिला. तर मुलगा वैभवला अनिल थोरे यांनी काठीने मारहाण केली. तुम्ही जर आमच्या नादी लागले तर तुम्हाला सोडणार नाही असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी सुनील थोरे, अनिल थोरे ( दोघे रा. कांगोणी शिवार ), कैलास ठोंबरे, सुजित ठोंबरे ( रा.पुरणगाव) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.