वैजापूर
आंदोलनात सहभागी झालेले वैजापूर एसटी आगारातील चालक दिपक दादाराव तुपे यांना आंदोलनाच्या ठिकाणीच भोवळ येऊन खाली कोसळल्याचा प्रकार शुक्रवारी घडला. विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांंनी सुरु केलेल्या आंदोलनामुळे प्रशासनाने आतापर्यंत वैजापूर आगारातील १९ कर्मचाऱ्यांचे निलंबन केले आहे. यात काही महिला कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. आगारातील चालक दिपक दादाराव तुपे यांच्यावरही खोटे आरोप करुन निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
तेव्हापासुन ते अस्वस्थ आहेत. त्यांना प्रशासनाकडुन कर्तव्यावर हजर राहण्यासाठी वारंवार सांगितले जात आहे. हजर न झाल्यास सेवासमाप्तीची कारवाई करु असा इशारा प्रशासनाने दिला आहे. त्यामुळे त्यांची मनस्थिती चांगली नसतानाच प्रशासनाने प्रशासनाने मेस्मा कायदा लागु करण्याच्या हालचाली सुरु केल्याने धसका घेतलेल्या तुपे यांना आंदोलनाच्या ठिकाणीच भोवळ आली व ते खाली कोसळले. कर्मचाऱ्यांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले असुन त्यांची प्रकृती स्थीर असल्याचे सांगण्यात आले.