नरेंद्र माळी धुळे जिल्हा प्रतिनिधी
धुळे:(१० डिसे) साक्री येथील एसटी बस आगारात येणार्या बसेस अडवून त्यांना बांगड्या, फुलहार दाखवून महामंडळाच्या कामात अडथळा निर्माण करणार्या १२ कर्मचार्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एसटी कर्मचार्यांचे शासनात विलिनीकरण करावे, या मागणीसाठी महिनाभरापासून कर्मचार्यांचे कामबंद आंदोलन सुरू आहे. तर दुसरीकडे महामंडळाने आता बसेस बाहेर काढायला सुरुवात केली आहे. बुधवारी सकाळी साडेअकरा ते दुपारी एक वाजेदरम्यान साक्री आगारात येणार्या बसेसला काही कर्मचार्यांनी प्रवेशद्वारावर अडवून हरकत घेतली. त्या बसेसच्या चालकांना बांगड्या व फुलहार दाखवून महामंडळाच्या कामात अडथळा निर्माण केला.
अशी फिर्याद आगारप्रमुख किशोर वंसत महाजन यांनी साक्री पोलिसात दिली आहे. त्यानुसार अनिता शरद खैरनार, योगिता कमलाकर बेडसे, माया संजय मोरे, मनिषा अनिल गावीत, अनिता जितेंद्र ढोमसे, मनिषा भास्कर कळकाटे, किरण निंबा पाटील, पुष्पलता भटूराव पवार, सोनाली अनिल जगताप, स्वप्नील शिवदास साळुंखे, अतुल राजाराम साळुंके, जयवंत सुभाष भामरे, सुनिल मधुकर भामरे यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धुळे-नंदुरबार जिल्ह्यात अनेक एसटी बस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची तर अनेकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे. मात्र असे असले तरी, कर्मचारी आपल्या आंदोलनावर ठाम आहेत. विलिनीकरण केल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही, अशी ठाम भूमिका आंदोलक एसटी बस कर्मचाऱ्यांनी मांडली आहे.