तालुक्यातील सिरसगाव ग्रामपंचायतींच्या सरपंचपदी सर्वसाधारण महिला गटातुन सीमा विश्वास निंबाळकर यांची निवड झाली आहे. पण ग्रामपंचायतींच्या कामकाजात त्यांचे पती विश्वास रावसाहेब निंबाळकर हे वेळोवेळी हस्तक्षेप करत असल्याने महिला सरपंचाचे आरक्षण मोडीत निघाले आहे. महिलांचे अधिकार पूरुष वापरत असल्याचे दिसुन आले आहे अशी तक्रार राहुल बबन धात्रक यांनी गटविकास अधिकारी ज्ञानोबा मोकाटे यांच्याकडे केली आहे. याबाबत दिलेल्या निवेदनात त्यांनी सरपंच व सरपंच पतीवर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. महिला सरपंच पती प्रत्येक मासिक मिटिंगमध्ये उपस्थित राहुन कामकाजात हस्तक्षेप करतात. महिला सरपंचाचे सर्व अधिकार वापरुन स्वतः सरपंच असल्याचे भासवतात.
आठ मार्च रोजी घेण्यात आलेल्या ग्रामसभेत सरपंच हजर राहणे गरजेचे असतांना सरपंच पती विश्वास निंबाळकर यांना सभेचे अध्यक्ष करण्यात आले. मात्र सभेच्या इतिवृत्तामध्ये सभेचे अध्यक्ष म्हणुन सीमा निंबाळकर यांची नोंद करण्यात आली. त्यामुळे सिरसगावच्या सरपंच कोण व अध्यक्ष कोण याबाबत ग्रामस्थांमध्ये संभ्रम नि्र्माण होत आहे. या प्रकाराची सखोल चौकशी करुन महिलांचे अधिकार वापरणाऱ्या पतीवर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदीनुसार गुन्हा दाखल करुन कारवाई करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.