वैजापूर भारती कदम प्रतिनिधि
मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद रस्ता योजनेत शेतकऱ्यांना रस्ते मिळावेत यासाठी रोजगार हमी योजनांच्या निकषात अनेक बदल करण्यात आले असुन कुशल अकुशल कामांची अट शिथिल करुन कामांचे प्रमाण ६०:४० घ्या ऐवजी ४०:६० असे करण्यात येईल. म्हणजे कुशल कामांचे प्रमाण ४० वरुन ६० पर्यंत वाढवण्यात येईल. रोहयो अंतर्गत शेततळे, विहिरी, सिमेंट नाला बांध आदी कामे करण्यासाठी जास्तीत जास्त निधी देण्यात येईल. त्यासाठी प्रशासनाकडे जास्तीत जास्त प्रस्ताव सादर करावे असे आवाहन राज्याचे रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी केले. तालुक्यासाठी जास्तीत जास्त निधी पुरवण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिली. तालुक्यात रोजगार हमी योजनेअंतर्गत मातोश्री पाणंद रस्ते योजनेअंतर्गत करण्यात येत असलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी येथील पंचायत समितीच्या सभागृहात सोमवारी बैठक घेण्यात आली. या बैठकीला आमदार रमेश बोरनारे, आमदार अंबादास दानवे, यांच्यासह उपजिल्हाधिकारी मंदार वैद्य, तहसिलदार राहुल गायकवाड, गटविकास अधिकारी ज्ञानोबा मोकाटे यांची प्रमुख उपस्थिती होती. अकुशलचा निधी न मिळणे, घरकुलची रक्कम लाभार्थ्यांना न मिळणे, प्रस्तावांना प्रशासकिय मान्यता न मिळणे, अशा तक्रारी यावेळी मांडल्या. त्याला उत्तर देताना भुमरे यांनी रस्त्याच्या कामासाठी कामाचे प्रमाण ४०:६० करण्यात येईल असे सांगितले.
शेततळे, पाणंद रस्त्यांसाठी जादा अनुदान, गोठ्यासाठी जनावरांची अट बारावरुन दोन करण्यात आली असुन रोहयो अंतर्गत फुलबाग, शेवगा, अंगुर, केळी, ड्रॅगन फ्रुट यांचा समावेश करण्यात येईल, सिंचनासाठी सिमेंट बंधारे बांधण्यात येतील असे भुमरे यांनी सांगितले. अधिकाऱ्यांनी माहिती अधिकार कायद्याचा धसका न घेता काम करावे याबाबत सरकार नेहमीच अधिकाऱ्यांच्या पाठिशी राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गटविकास अधिकारी मोकाटे यांनी प्रास्तविकात सध्या तालुक्यात ग्रामपंचायतींच्या ४८ कामावर ४३६ व इतर यंत्रणांच्या कामावर एकुण ७५४ मंजुर काम करत असुन मातोश्री पाणंद रस्त्यांची तालुक्यातील १२३ ग्रामपंचायतींची एक हजार ५२३ कामे असुन दोन हजार ६०६ किमी लांबीच्या रस्त्यांचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत अशी माहिती दिली. या बैठकीत ग्रामसेवक संघटनेचे आर. बी. निकम, खांडगौरे, ग्रामरोजगार सेवक यांनीही मंत्र्यांसमोर समस्या मांडल्या.
फोटो सह