वैजापूर भारती कदम
वैजापूर येथे सर्वसामान्य रुग्णांसाठी बांधण्यात आलेल्या शंभर खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात अनेक समस्या आहेत. डॉक्टर, रुग्णवाहिका चालक, वर्ग चारच्या रिक्त जागा, पॅथो लॅब टेक्निशियन नसणे, सदोष ड्रेनेज व्यवस्था, गळके छत व डॉक्टरांची वारंवार गैरहजेरी या समस्यांमुळे रुग्णांचे हाल होत आहेत. या समस्या प्राधान्याने दुर करण्याची मागणी राज्याचे माजी उद्योग संचालक जे.के. जाधव यांनी मराठवाडा विकास मंचातर्फे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे. जाधव यांनी नुकतीच आरोग्य मंत्री टोपे यांची मंत्रालयात भेट घेऊन याबाबत चर्चा केली. वैजापूर येथील रुग्णालयात विविध विभागांच्या डॉक्टरांच्या सोळा जागा असुन दररोज केवळ तीन ते चार डॉक्टर कामावर हजर असतात.
आळीपाळीने तीन ते चार डॉक्टर कामावर येतात व इतर डॉक्टर गैरहजर राहतात. त्यामुळे रुग्णांची प्रचंड गैरसोय होते. रुग्णालयात सर्व विभागांचे डॉक्टर उपस्थित राहावे याबाबत आरोग्य उपसंचालक व जिल्हा शल्य विशारद यांना सुचना कराव्यात असे निवेदनात नमुद करण्यात आले आहे. रुग्णालयात एक एमडी मेडिसिन व एक रेडिओजॉजिस्ट डॉक्टरांची तातडीने नेमणुक करावी, या ठिकाणी तीन रुणवाहिका आहेत. पण चालक नसल्याने रुणांची तारांबळ होते. ड्रेनेज व्यवस्था सुधारण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला आदेश द्यावे, महिला दंतरोग तज्ञ या आठ वर्षांपासुन कार्यरत आहेत पण त्या वारंवार गैरहजर राहत असल्याने त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी जे.के. जाधव यांनी केली आहे.
" उपजिल्हा रुग्णालयातील समस्यांबाबत आपण आरोग्य मंत्री टोपे यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांना लिखित स्वरुपात निवेदन दिले असुन यावर लवकरच बैठक घेऊ असे आश्वासन टोपे यांनी दिले."
जे.के. जाधव, माजी उद्योग संचालक