वैजापूर
लग्नाचे आमिष दाखवून शहरातील एका महाविद्यालयात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीस पळवून नेवून अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. पिडीत मुलगी चिंचडगाव (तालुका वैजापूर) येथील रहिवासी असून तिने तक्रार दिल्यानंतर संशयितांविरुदध वैजापूर पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. कृष्णा काशिनाथ तांबे (राहणार चिंचडगाव) असे आरोपीचे नाव आहे. या घटनेबाबत पोलिसांनी सांगितले की पिडीत तरुणी ही शहरातील एका महाविद्यालयात शिकते. ती ८ डिसेंबर रोजी कॉलेजला जाण्यासाठी घराबाहेर पडली. मात्र घरी न परतल्याने घरच्या मंडळींनी तिचा शहरात सर्वत्र शोध घेतला. मात्र ती सापडली नाही.
त्यामुळे तिच्या वडिलांनी कॉलेजमध्ये जावून सीसीटीव्ही फुटेज तपासले असता या फुटेजमध्ये ही मुलगी गावातीलच कृष्णा तांबे याच्या सोबत दुचाकीवर जाताना आढळून आली. ही मुलगी शुक्रवारी लाडगांव रोडवर असल्याची माहिती घरच्यांना मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने तिथे जाऊन मुलीला ताब्यात घेतले व पोलिस ठाणे गाठले. यावेळी मुलीने सांगितलेल्या माहितीनुसार, आरोपीने तिला मावळ तालुक्यातील एका गावात नेवून तिथे दोन दिवस ठेवले व शारीरिक अत्याचार केले. महिला सुरक्षा समितीसमोर पिडीत मुलीचा जवाब नोंदवण्यात आला. याप्रकरणी आरोपीविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात अपहरण व बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.