Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

लाखो ब्रास गौण खनिजाचा साठा अवैधरित्या येथून लंपास करण्याचा धडाका दिवसरात्र सुरु

 


वैजापूर -स्व.बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गासाठी स्थानिक महसूल विभागाची अधिकृत संमती न घेता दगड,मुरुमासाठी बोरदहेगाव शिवारातील सरकारी गायरान जमीन गट क्रंमाक १६३ पोखरणाऱ्या कंत्राटदाराचे पोकलँण्ड यंत्रासह तीन टिप्पर तहसीलदार राहूल गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने जप्त करण्याची कारवाई केली.कित्येक दिवसापासून या सरकारी जमिनीत संबधित कंत्राटदाराकडून दिवसरात्र खोदकाम करुन लाखो ब्रास गौण खनिजाचा साठा अवैधरित्या येथून लंपास करण्याचा धडाका दिवसरात्र सुरु होता.स्थानिक स्तरावर कंत्राटदार खोदकामा करिता प्रशासकीय परवानगी आदेश असल्याच्या नावाखाली गायरान जमिनीच्या भुगर्भातील गौण खनिजाचा साठा खोदून वाहनाद्वारे येथून  स्थलांतरित करीत असलेल्या प्रकाराची महिती पर्यावरण संवर्धक नागरिक गोकुळ सुराशे यांनी महसूल विभागातील वरिष्ठ अधिका-यांना दिल्यानंतर कंत्राटदारावर कारवाई करण्याचे सूत्र हलले.याठिकाणी तहसीलदार राहूल गायकवाड, मंडळ अधिकारी रिता पुरी, तलाठी महेंद्र गायकवाड, गौण खनिज सुरक्षारक्षक पठाण यांच्या पथक दाखल होताच.याठिकाणाहून खोदकाम करणारे यंत्रासह टिप्पर पळून जाण्याच्या तयारीत होते.पथकातील तलाठी गायकवाड यांनी खोदकाम परिसराचा वस्तुनिष्ठ पंचनामा करुन MH-20EG9504,MH20DT5904, MH20ET6804,विना क्रमाकांचे पोकलँण्ड जप्त करण्याची कारवाई करण्यात आली.जप्त केलेली वाहने पळून जावू नये याकरिता वैजापूर पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आल्याची महिती मंडळ अधिकारी रिता पुरी यांनी दिली. 


प्रशासनाच्या कारवाई कडे सर्वाच्या नजरा

समृद्धी महामार्गासाठी कंत्राटदाराकडून अवैधरित्या गौण खनिज उत्खनन आणि वाहतूकीवर स्थानिक महसूल प्रशासनाकडून कडक कारवाई होत नसल्यामुळे कंत्राटदार मोकाट सुटले आहेत.वर्षभरापुर्वी कंत्राटदारांनी नांदूर- मधमेश्वर जलद कालव्याचा भराव पोखरुन २२ लाखाचा मुरुम साठा अवैधरित्या पळवल्याची महिती नांदूर मधमेश्वर कालव्याचे कार्यकारी अभियंत्यांनी उपविभागीय महसूल अधिका-यांना लेखी पत्राद्वारे कळवले होते.यावर महसूल विभागाने कोणतीही दंडात्मक कारवाई न करता प्रकरण गुंडाळून ठेवलेले आहे.त्यामुळे बोरदहेगाव शिवारातील अवैधरित्या मुरुम खोदकामावर महसूल प्रशासनाच्या काय कारवाई करणार याकडे लक्ष लागल्याची उत्सुकता निर्माण झाली आहे. 

सरकारी गायरान जमिनीची झाली चाळणी 

बोरदहेगाव शिवारातील सरकारी गायरान गट क्रमांक १६३ मध्ये कंत्राटदाराने बेसुमार प्रमाणात खोदकाम करुन जमिन परिसराची अक्षरशः चाळणी केली आहे.कंत्राटदाराने कोणाच्या पाठबळावर याठिकाणी दिवसरात्र गौण खनिज खोदकामाचे धाडस दाखवले यांची चर्चा परिसरात होत आहे