वैजापूर
शेतीचे पैसे मागतात म्हणून वृद्ध पित्याला मुलाने दगडाने मारहाण करून जखमी केल्याची घटना पानव (तालुका वैजापूर) येथे घडली. याप्रकरणी अप्पासाहेब लक्ष्मण मोहन यांच्याविरूध्द पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाणव येथील लक्ष्मण पुंजाबा मोहन यांची पाणव शिवारात दोन एकर शेतजमीन असून ते पत्नी, मुलगा, सून व नातवंडाबरोबर येथे राहतात. मुलगा अप्पासाहेब हाच शेती करून खातो पण आई वडिलांना खर्चासाठी पैसे देत नाही. शनिवारी लक्ष्मण पूंजाबा हे घरासमोरील जागेत उभे असताना मुलगी अप्पासाहेब तेथे आला.
त्यावेळी लक्ष्मण यांनी याबाबत आप्पासाहेब यांना जाब विचारला. पैसे देणार नसशील तर शेती करू नको असे सांगितले. याचा राग धरत आप्पासाहेब याने दगडाने त्यांच्या डोक्यात वार करून जखमी केले. जखमी अवस्थेत त्यांनी वैजापूर येथील सरकारी दवाखान्यात जाऊन उपचार केले. त्यानंतर पोलिसात जाऊन फिर्याद दिली. त्यावरून आप्पासाहेब मोहन यांच्याविरूध्द मारहाण, शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी दिल्याचे आरोपाखाली वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक आर एच शेख हे करीत आहेत.