अवंदा नवीन वरशाला
ईडा, पिडा टळावी
रोगराई उंबऱ्याची
धूम ठोकून पळावी.
नगं ईचारु काय झालं
कसं गेलं जुनं सालं
पोट पाठीचं चिपाड
हाती सरमाड आलं.
माह्या तान्ह्या लेकरानी
यंदा धरावं बाळसं
करू आईचा गोंधळ
जवा येईल बारसं.
काळ्या उजाड रानामंदी
माती व्हावी न्हातीधुती
सुप भरून कुणब्याची
जमा व्हावी नातीगोती.
पुरणपोळी कडब्याचा
दावीन निवद पोळ्याला
पायी दिंडी पालखीच्या
लावू हजेरी सोहळ्याला.
हाये आस देवराया
नव्या नवीन वरशाची
माही उगो सांजसकाळ
परडी भरून हरशाची.
रज्जाकभाई शेख श्रीरामपूर