Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गुडबाय २०२१ विशेष



 प्रतिनिधि वैजापूर भारती कदम

        संपुर्ण जगाला भेडसावणाऱ्या करोनाच्या समस्येने २०२१च्या पुर्वाधात तालुक्यात डोके वर काढल्याने वर्षांची सुरुवात निराशाजनक झाली. त्यानंतर कधी कमी तर कधी जास्त करोना रुग्णांची संख्या असे हेलकावे खात व टाळेबंदीचे चटके सोसत वर्षांची वाटचाल सुरु झाली. या एक वर्षाच्या काळात तालुक्याच्या राजकिय, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात फारसे बदल घडले नसले तरी टाळेबंदी उठल्यानंतर सामाजिक अंतर कमी होऊन सर्व व्यवहार सुरळित पुणे सुरु झाल्याने दिलासा मिळाला आहे.

         या काळातच करोना प्रतिबंधक कोव्हीशिल्ड व कोव्हॅक्सिन या दोन लसी घेणाऱ्यांचे उद्दिठ साध्य करण्यासाठी प्रशासनाने धडाडीने पाऊले उचलली. मात्र हे वर्ष खऱ्या अर्थाने लक्षात राहील ते गुन्हेगारी क्षेत्रात झालेल्या वाढीच्या घटनांमुळे ! प्रेमविवाह केला म्हणुन सख्ख्या आई व नातलगांनी मुलीच्या सासरी जाऊन तिचे शीर धडावेगळे केल्याची घटना तालुक्यातील गोयगाव शिवारात वर्षाच्या उत्तरार्धात घडली. या घटनेने सर्वांचा थरकाप उडाला. याशिवाय तालुक्यातील वैजापूरसह शिऊर व वीरगाव पोलिस ठाण्यांच्या हद्दीत अनेक गुन्हे घडले व त्यातील काही गुन्ह्यांच छडा लावण्यात पोलिसांना यश आले. या वर्षांत वैजापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत महिलांवरील अत्याचारासह विनयभंगाचे नऊ गुन्हे नोंदवण्यात आल्याची माहिती आहे. चोरीच्या घटनांत वाढ होऊन या वर्षांत एकुण ७३ घटनांची नोंद झाली असुन त्यातील २२ आरोपींना पोलिसांनी गजाआड केले आहे. 

        मागील वर्षात चोरीच्या घटनांची संख्या केवळ ४४ होती. मारहाणीच्या अनेक घटना घडल्या. त्यात वाढ झाल्याचे पोलिसांनी दिलेल्या माहितीवरुन दिसुन येते. या वर्षात रस्ते अपघाताच्या जवळपास चाळीस घटना उघडकिस आल्या. यात नागरिकांना जीव गमवावा लागला. वर्षाच्या सुरुवातीस तालुक्यातील तीन जानेवारी रोजी तालुक्यातील १०३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत ८८९ ग्रामपंचायत सदस्य नव्याने निवडुन आले. या निवडणुकांमुळे तालुक्यातील ग्रामीण भागात राजकिय वातावरण ढवळुन निघाले. समृद्धी महामार्गाच्या कामाने आघाडी घेतल्यामुळे तालुक्याचा चेहरामोहरा बदलण्यास सुरुवात झाली ती याच वर्षात. येवला तालुक्याच्या नांदगाव येथील हद्दीपासुन शिऊर हद्दीपर्यंत जात असलेल्या राष्ट्रीय महामार्गाचे काम पुर्णत्वास गेला. याशिवाय गंगापूर रस्ताही चौपदरी झाल्याने शहराला जोडणारे सर्वच रस्ते सुधारले आहेत. परिणामी शहराच्या सौंदर्यात वाढ झाली. शहराबाहेरुन जाणारा नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग व नव्याने विकसित होणारी कृषि समृद्धी केंद्रे अर्थात स्मार्ट सिटी चाही श्रीगणेशा होत असल्याने संपुर्ण तालुका विकासाच्या बाबतीत आघाडीवर नेण्यास या वर्षांत सुरुवात झाली आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत वैजापूर नगरपालिकेचा पश्चिम विभागातुन २२ वा क्रमांक आला. नगरपालिकेने पाच कोटी रुपयांचे बक्षिस पटकावले.सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. खरीप पिक हातचे गेल्याने बळीराजा डबघाईला आला. शासनाने बळीराजाला मदत केली खरी. या पावसाने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नारंगी तलावात शंभर टक्के पाणी साचले. त्यामुळे पाटबंधारे विभागाने धरणाचे दरवाजे उघडण्याची कार्यवाही केली. नारंगी धरण भरल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. वैजापूर विधानसभा मतदारसंघाचे सलग तीन वेळा प्रतिनिधीत्व करणारे शिवसेनेचे माजी आमदार व पाणीदार कार्यकर्ता अशी ओळख असणारे रंगनाथ मुरलीधर उर्फ आर. एम. वाणी यांनी एक सप्टेंबर रोजी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या जाण्याने केवळ तालुक्याचे नव्हे तर मराठवाड्याचे अपरमीत नुकसान झाले.
 आगामी वर्षात त्याला मुर्त स्वरुप येईल अशी अपेक्षा करुया ..