वैजापूर-येथील विजेता स्पोर्टस् असोसिएशनच्या खेळाडूंनी पिंपळगाव(बसमत) जिल्हा नाशिक येथे जीत कुने-दो असोसिएशनच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत पाच सुवर्ण आणि एक रौप्य पदकांची नोंद वैजापूर शहराच्या नावावर केली.
या स्पर्धेमध्ये १२ वर्षाखालील वयोगटातुन २३ किलो वजनगटात अथर्व दत्तात्रेय घाटे व ३८ किलो वजनगटात साई गणेश निखाडे यांनी सुवर्णपदक तर १४ वर्षाखालील वयोगटातुन ६१ किलोवरील वजनगटात तन्मय विजय माताडे याने सुवर्णपदक आणि १७ वर्षांखालील वयोगटातुन ३९ किलो वजन गटात अलोक बाळू इंगळे व ५३ किलो वजन गटात यश गणेश निखाडे यांनी सुवर्णपदक पटकाविले. याच बरोबर १९ वर्षाखालील वयोगटातुन ४९ किलो वजनी गटात कोमल संतोष इंगळे हिने रौप्यपदक मिळवत वैजापूर शहराचे नावलौकिक केले.
वरील सर्व खेळाडू हे विजेता स्पोर्ट्स असोसिएशनचे सचिव व मुख्य प्रशिक्षक निलेश नरवडे यांच्या मार्गदर्शनाखाली मिक्स मार्शल आर्टच्या खेळांचे प्रशिक्षण घेत असून त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी पारस घाटे, राजेंद्र जोशी, किरण आगाज याच बरोबर सर्व पालकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.