Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

प्रॉपर्टी कार्डमुळे ग्रामीण भागातील जमिनीचे वाद संपुष्टात येतील

ड्रोनद्वारे गावठाण भूमापन कार्यशाळा -जिल्हाधिकारी एस रामामूर्ती


बुलडाणा,
         दि. 15: केंद्र शासनाने गावठाणमधील मालमत्तांचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्याचा महत्वाकांक्षी कार्यक्रम सुरू केला आहे. या कार्यक्रमातंर्गत गावठाणमधील प्रॉपर्टीचे बिनचूक मोजणी होणार आहे. या प्रॉपर्टी कार्डमुळे ग्रामीण भागात असलेले जमिनीचे वाद निश्चितच संपुष्टात येतील, असा आशावाद जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांनी आज व्यक्त केला. स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात भूमी अभिलेख, महसूल व ग्रामविकास विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या ड्रोनद्वारे गावठाण भूमापन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे, उपविभागीय अधिकारी श्री. हांडे, तहसिलदार रूपेश खंडारे, जिल्हा अधिक्षक भूमि अभिलेख सुनील वाणी, पोलीस निरीक्षक श्री. सोनकांबळे आदी उपस्थित होते.
ड्रोनद्वारे गावठाण भूमापनाचे काम यंत्रणांनी सक्रीय सहभाग घेवून प्रभावीरित्या करण्याच्या सूचना करीत जिल्हाधिकारी म्हणाले, केंद्र शासनाची प्रॉपर्टी कार्ड देणारी ही स्वामित्व योजना आहे. या योजनेमुळे ग्रामपंचायतीला स्वउत्पन्नाचे साधन निर्माण होणार आहे. ड्रोन तंत्रज्ञान हे अत्याधुनिक तंत्रज्ञान असून भविष्यातही शासनाच्या बऱ्याच योजनांमध्ये या तंत्रज्ञानाचा उपयोग होणार आहे. त्यामुळे ग्रामपातळीवरील शासकीय यंत्रणेतील कर्मचाऱ्यांची हे तंत्रज्ञान अवगत करावे. सदर तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी ड्रोनद्वारे गावठाणाचा सर्वे ही सुवर्णसंधी आहे. ग्रामसेवक, तलाठी यांनी आपल्या गावात सर्वेक्षण होण्याच्या दिवशी भूमिअभिलेखच्या चमूला सहकार्य करावे व आपल्या गावाचे गावठाण 100 टक्के ड्रोनने मोजून घ्यावे.

उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. लोखंडे यावेळी म्हणाले, ड्रोन सर्वेमुळे गावागावात वर्षानुवर्ष पिढयान पिढ्या सुरू असलेले वाद निकाली निघतील. ड्रोनसर्वेसाठी ग्रामसेवकांनी नमुना 8 अचूक व अद्ययावत द्यावा. गाव नमुना 8 वरच गावठाणाचे सर्वेक्षण अवलंबून असून त्यानुसारच प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे. तसेच नमुना 8 वर जो मालक असेल, तोच द्यावा. वारसही जितके असतील तितकेच द्यावे. त्यामध्ये बदल करू नये. या कामाला प्राधान्य देवून ग्रामसेवकांनी सक्रीय सहभाग द्यावा.


प्रास्ताविक जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख सुनील वाणी यांनी केले. ते म्हणाले, अमरावती विभागात ड्रोनद्वारे गावठाण सर्वेक्षणात बुलडाणा जिल्ह्याची गती कायम आहे. स्वामित्व योजनेची अंमलबजावणी ग्रामविकास विभागाचेवतीने करण्यात येणार आहे. त्यामुळे ग्रामविकास विभागाची भूमिक महत्वाची आहे. ग्रामसेवकांनी गावात मालमत्ता धारकाकडून दिलेला अर्ज भरून घ्यवा. तसेच छोटा फ्लेक्सवर मालमत्ता क्रमांक ठळक स्वरूपात छापून घ्यावा. सदर मालमत्ता क्रमांकाचा फ्लेक्स घराच्या छतावर किंवा घरासमोरील दर्शनी भागात लावण्यास सांगावे. जेणेकरून ड्रोनमध्ये मालमत्ता क्रमांक दिसून येईल. त्यामुळे आणखी बिनचूक गावठाण भूमापन शक्य होईल. ज्या दिवशी नागरिकांनी त्यांच्या मालमत्तेची सनद देवू तो विभागासाठी आनंदाचा दिवस असेल. संचलन उपअधिक्षक भूमि अभिलेख व्ही. ए सवडतकर यांनी केले. कार्यशाळेला तलाठी, ग्रामसेवक आदी उपस्थित होते