Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

साहित्यात अभिव्यक्ती स्वातंत्र्याची क्षमता




 वैजापूर

        "साहित्यात अभिव्यक्ती स्वातंत्र्याची अफाट क्षमता आहे. पण डॉ. नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे व गौरी लंकेश यांच्या हत्या म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर दहशत निर्माण होत आहे का असा प्रश्न पडणारी आहे. ही समाजव्यवस्था बदलायची असेल लेखकांनी सांस्कृतिक दहशतवादाविरुद्ध ठामपणे उभे राहुन आपली लेखणी निडरपणे चालवली पाहिजे अशी अपेक्षा वैजापूर येथे आयोजित जिल्हा प्रगतीशील साहित्य संमेलनात लेखकांनी व्यक्त केली.  प्रगतिशील लेखक संघातर्फे येथील पंचायत समितीच्या सभागृहात रविवारी एक दिवसीय साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनाच्या ॲड.अस्लम मिर्झा हे होते तर प्रसिद्ध लेखक डॉ.निरंजन टकले यांनी संमेलनाचे उद्घाटन केले. प्रगतिशील लेखक संघांचे राज्य उपाध्यक्ष सुधाकर शेंडगे, राज्य सरचिटणीस राकेश वानखेडे, स्वागाध्यक्ष दिनेशसिंह परदेशी, माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, प्रशांत सदाफळ, साहेबराव औताडे यांची प्रमुख उपस्थिती होती. शहरातील बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून संविधान मशाल प्रज्वलित करून संमेलनाच्या ठिकाणी फेरी काढण्यात आली. संमेलनाच्या प्रथम सत्रात मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर मान्यवर लेखकांनी मनोगत व्यक्त केले. प्रसिद्ध लेखक डॉ टकले यांनी फॅसिस्ट प्रणालीवर सडकुन टिका केली.

         वि. दा.सावरकर हे फॅसिझम व्यवस्थेचे निर्माते आहेत असा आरोप त्यांनी केला. हिंदुत्व ही द्वेषावर आधरित राजकिय विचारसरणी आहे.या विचारसरणीवर मात करायची असेल तर विद्वेषाच्या भिंती तोडाव्या लागतील असे ते म्हणाले. प्रत्येक अंधाराच्या ठिकाणी साहित्याची मशाल पेटवुन ज्ञानाचा प्रकाश पसरावा लागेल. प्रगतीशील लेखक संघातर्फे आयोजित या साहित्य संमेलनातुन डॉ. टकले यांनी विवेकाचा आधार घेण्याचा सल्ला दिला. संमेलनाचे अध्यक्ष अॅड.अस्लम मिर्झा यांनी मनोगतात फॅसिझम प्रकाश टाकला. एके काळी फॅसिझमच्या विरोधात एकजुटीने उभे राहुन पराभव केला होता. पण आता या फॅसिझम ने मागील दाराने प्रवेश केला आहे.फॅसिझमच्या विरोधात बोलणाऱ्याला आज देशद्रोहाचे प्रमाणपत्र दिले जाते. देशात अनेक समस्या आहेत. पण राजकिय पक्ष आपल्या भाकरी भाजण्यात व्यस्त आहेत. प्रतिगामी विचारांना तिलांजली देऊन लेखकांनी विज्ञानवादी विचारांची कास धरावी असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन समाधान इंगळे यांनी केले. शमीम सौदागर यांनी या सत्रात आभार व्यक्त केले. सांस्कृतिक दहशतवाद आणि लेखकाची भुमिका या विषयावर आयोजित परिसंवादात डॉ. प्रतिभा अहिरे, डॉ. मुस्तजिब खान, अबु बक्र रहबर व शेखर मगर यांनी मराठी साहित्य, नाटक, सिनेमा, पत्रकारिता अल्पसंख्यांक, पत्रकारिता ललित या क्षेत्रात फोफावलेल्या दहशतवादावर प्रभावी भाष्य केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अहमद पठाण यांनी केले. येथील बालसाहित्यिक धोंडिरामसिंह राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कविसंमेलनात नम्रता फलके, लक्ष्मण खेडकर, सलीम नजमी, निकिता पठारे, दैवत सावंत, रवि कोरडे, सचिन वालतुरे, काझी,  प्रवीण दाभाडे, ज्ञानेश्वर खिल्लारे, आशा डांगे, विलास बोर्डे, पवन ठाकुर, डॉ सुभाष भोपळे, साईनाथ फुसे, चक्रधर डाके, अहमद पठाण, सुनिल उबाळे, अशोक गायकवाड, जी.के.ढमाले, इम्रान शेख, रोहिणी धात्रक व धोंडिरामसिंह राजपूत यांनी आपल्या बहारदार कविता सादर करुन प्रेक्षकांची मने जिंकली.  या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन धम्मपाल जाधव यांनी केली. कारी अब्दुल अलीम यांनी आभार मानले. निरोप समारंभात जेष्ठ कथाकार उत्तम बावस्कर, जेष्ठ साहित्यिक डॉ.प्रल्हाद लुलेकर यांनी लेखकांकडुन अपेक्षा व्यक्त करत समाजव्यवस्थेवर टिका केली. लेखकांनी समाजाची मानसिकता बदलण्याची जबाबदारी घ्यावी असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रमोद पठारे यांनी केले.