पत्नीस जन्मठेप, पतीस सात वर्ष कारावास |
वैजापूर
पाच वर्षीय मुलीचा गळा दाबून खून केल्याप्रकरणी वैजापूर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने दाम्पत्याला शिक्षा सुनावली. याप्रकरणात पत्नी संगीता नितीन पाटील (२५, राहणार रांजणगाव, तालुका गंगापूर) हिस जन्मठेप व दहा हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने सध्या कैदेची शिक्षा तर पती नितीन रामदास पाटील (३५) यास सात वर्ष सक्त मजुरी, पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने सध्या कैदेची शिक्षा सुनावली. न्यायालयाने नितीन पाटील याची खून, अट्रॉसिटी व पळवून नेल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्तता केली असून त्याला पुरावा नष्ट केल्याच्या गुन्ह्याखाली दोषी ठरवण्यात आले आहे. संगीता हिला अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यामधुन (अट्रॉसिटी) निर्दोष मुक्तता केली आहे. संगीता हिस खुनाच्या आरोपाखाली दोषी ठरवून शिक्षा करण्यात आली. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश एम. मोईउद्दिन एम. ए. यांनी याप्रकरणाचा निकाल दिला. प्रकरणाची अधिक माहिती अशी की, रांजणगाव शेण पुंजी येथील रहिवासी कैलास हरिभाऊ बघाटे हे खासगी नोकरी करत पत्नी मंगल, मुलगी प्रणाली व मेहुणा विशाल इंगोले यांच्यासह राहत होते.
आरोपी दाम्पत्य हे त्यांच्या घरा शेजारी केशव ढगे यांच्या घरात भाड्याने राहत होते. २४ जून २०१५ रोजी ही घटना घडली होती. मंगल यांची बेंटेक्स ची पोत संगीता हिने चोराल्याबाबत मंगल यांनी संगीताच्या पतीस सांगितल्यानंतर पतीने संगीता हिस मारहाण करून माहेरी पाठवले होते. माहेरहून आल्यानंतर याचा राग धरत संगीताने मंगलची मुलगी प्रणाली हिस खेळत असताना पळवून कापडाने गळा दाबून खून केला. तिचे प्रेत स्टीलच्या टाकीत चादरित गुंडाळून ठेवले. नंतर वास सुटल्याने प्रणालीचे प्रेत आपल्या घरासमोरील नालीत टाकून दिले. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून ओळख पटवली.
पाटील दाम्पत्याच्या घरामध्ये रक्ताचे डाग आढळून आल्यानंतर दोघांविरुद्ध वाळूज पोलिस ठाण्यात खून, पळवून नेणे, पुरावा नष्ट करणे व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी वकील नानासाहेब जगताप यांनी के यु झिने, कैलास साबळे, तपासी अमलदार व्ही.व्ही.बुवा, एस. एस. गांगुर्डे, श्रीमती देगलुरकर, केशव ढगे यांच्यासह. तेरा जणांच्या साक्षी तपासल्या. साक्षीपुरावे यांच्या आधारे दोघांना दोषी ठरवुन न्यायालयाने पती पत्नीस वरील शिक्षा ठोठावली. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी वकिल नानासाहेब जगताप यांनी काम पाहिले. त्यांना पोलिस निरीक्षक संदिप गुरमे व पैहरवी पोलिस नाईक दाभाडे यांनी सहकार्य केले.