प्रतिबंधक कारवायांचे उल्लंघन करून गुन्हेगारी सुरूच ठेवल्याने वैजापूर येथील वडारवाडा भागातील नामचीन गुंड राहुल गणेश शिंदे यांच्यावर स्थानबद्धतेची कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पारित केले. राहुल शिंदे याला २६ नोव्हेंबर रोजी औरंगाबाद येथील मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले. राहुल यांच्यावर वैजापूर व श्रीरामपूर येथील पोलिस ठाण्यात मुलीस पळवुन नेणे, कायदेशीर रखवालीतुन पळुन जाणे, सार्वजनिक ठिकाणी मारामारी करणे, लुटमार करणे, शस्त्रासह मारामारी करुन जखमी करणे, लैंगिक अत्याचार करणे हे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कारवाया रोखण्यासाठी फौजदारी प्रक्रिया १९७३ प्रमाणे प्रतिबंधक कारवाई करण्यात आली असुन त्याचे उल्लंघन केल्याने त्यांचे विरुद्ध फौजदारी प्रक्रियेच्या कलम १२२ प्रमाणे प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली आहे. परंतु या कारवायांचा त्यांच्यावर काहीही परिणाम झाला नसल्याचे निदर्शनास आले होते. त्याने गुन्हेगारी व धोकादायक कारवाया सुरुच ठेवल्या. समाजस्वास्थ्याच्या दृष्टीने राहुल शिंदे यांच्या गुंडगिरीला प्रतिबंध करणे गरजेचे असल्याने जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी शिंदे यांच्या स्थानबद्ध तेचे आदेश पारित केले. आरोपींविरुद्ध महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड, हातभट्टीवाले, औषधी द्रव्य विषयी गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती, दृकश्राव्य कलाकृतींचे विनापरवाना प्रदर्शन करणे, (व्हिडीओ पायरसी), वाळु तस्कर,अत्यावश्यक वस्तुंचा काळाबाजार करणे अशा विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत असलेल्या अधिनियम १९८१ चे कलम
३(१) नुसार स्थानबद्धतेचे आदेश पारीत करण्यात आले. ही कारवाई पोलिस अधिक्षक निमित गोयल, अप्पर पोलिस अधिक्षक डॉ पवन बनसोड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संतोष खेतमाळस पोलिस निरीक्षक सम्राटसिंह राजपूत यांनी केली आहे.