चिखली
पंढरपूरला दर्शनासाठी निघालेल्या एकाच कुटुंबातील ९ भाविकांच्या टाटा सुमो कारला भरधाव बोलेरो पिकअपने धडक दिली. यात ३ भाविक जागीच ठार तर दोघींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. खामगाव- चिखली रोडवरील उंद्रीनजिक सह्याद्री हॉटेलजवळ आज, २६ ऑक्टोबरला सकाळी साडेनऊच्या सुमारास ही भीषण दुर्घटना घडली. मृतक आणि जखमी अकोला शहरातील कौलखेडचे आहेत.माहिती मिळताच अमडापूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून नागरिकांच्या मदतीने मदतकार्य सुरू केले. जखमींना आधी खामगावच्या सामान्य रुग्णालयात, नंतर अकोला येथील सरकारी रुग्णालयात हलविण्यात आले.
अकोला शहरातील कौलखेड भागातील रहिवासी एकाच कुटुंबातील ९ भाविक महिला-पुरुष पंढरपूरला दर्शनासाठी टाटा सुमो कारने MH30 AA2255 पहाटेच निघाले होते.खामगाव सोडल्यानंतर उंद्रीनजिकच्या सह्याद्री हॉटेलजवळ त्यांच्या भरधाव टाटा सुमो कारची समोरून भरधाव येणाऱ्या महिंद्रा बोलेरो पिकअप वाहनाशी MH 28 BB 0023 जोरदार धडक दिली धडक इतकी भीषण होती की तिघांचा जागीच मृत्यू झाला. विश्वनाथ पिराजी कराळ (७२), बाळकृष्ण खर्चे (७०), श्यामसुंदर रोकडे (५०) यांचा जागीच मृत्यू झाला. सौ. शकुंतला विश्वनाथ कराळ (६२, रा. गायत्रीनगर अकोला) यांचा खामगावच्या सामान्य रुग्णालयात आणि सुलोचना रोहनकार यांचा अकोल्यात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
जखमी मुरलीधर रोहनकार, उषा ठाकरे, श्यामराव ठाकरे यांना आधी खामगाव, नंतर अकोल्याला हलविण्यात आले, तर अलका खर्चे यांच्यावर खामगावमध्येच उपचार सुरू आहेत. हा अपघात घडला असतानाच सुमोच्या मागून येणारी महावितरणची बोलेरो कारही (MH28V2601) सुमोला धडकली. मात्र दोन्ही दोन्ही बोलेरो वाहनांतील व्यक्ती अपघातानंतर तातडीने पसार झाले. मात्र तेही जखमी झाले असण्याची शक्यता आहे.