रसायनमिश्रित पाणी शुद्ध करणारा कंपनीतील ईटीपी प्लांट |
मलकापूर
शेतकऱ्यांची शेती तर कामगारांची कंपनी वाचविण्याच्या धडपडीतुन दसरखेड परिसरात संघर्ष उभा ठाकला आहे. काही केल्या हा संघर्ष मिटण्याची शक्यता दिसत नाही. एकाला न्याय देतांना दुसर्यावर अन्याय होणार ही बाब अटळ असल्याने या प्रकरणी मार्ग निघणे अवघड झाले आहे. त्यामुळे निर्माण झालेला गुंता सुटणार तरी कसा अन् तो सोडवणार तरी कोण ? ही बाब अनुत्तरितच राहत आहे.
दसरखेड एमआयडीसी परिक्षेत्रातील बेंन्झो केमिकल कंपनीतून रसायनमिश्रीत पाणी सोडल्या जात असल्यामुळे परिसरातील शेत-शिवार व जल स्तोत्राचे नुकसान होत असल्याची ओरड असून शेतकरी वर्गातून अनेक वर्षापासून संताप व्यक्त होत आहे. महत्त्वाचे म्हणजे ऐन पावसाळ्यातच हा संताप चांगलाच उफाळून येतो. शेतकऱ्यांचे नाहक नुकसान होऊ नये हीच समाजमनाची प्रांजळ भावना आहे मात्र या भावनेला राजकीय पाठबळ मिळून समस्येचे अतिरिक्त प्रमाणात राजकारण केल्या जात आहे. त्यामुळे कंपनी प्रशासना विरोधात वातावरण निर्मिती होत आहे. राजकीय हस्तक्षेपामुळे शेतकऱ्यांसह या प्रकरणाशी संबंध नसलेल्या इतर लोकांकडून कंपनी विरुद्ध बंदची भूमिका वठवली जात आहे.
परिणामत: नेहमीचा होणारा विरोध व वादाला कंटाळून कंपनी दुसरीकडे हलविण्याची हालचाल वरिष्ठ स्तरावरून होत असल्याने कंपनीतील कामगारांमध्ये यावेळी कमालीची अस्वस्थता व अस्थिरता निर्माण झाली आहे. कंपनी बंद झाली तर आपले व आपल्या परिवाराच्या उदरनिर्वाहाचे काय होईल ? रोजगार बुडाला तर जगायचे कसे ? या चिंतेने कंपनीत काम करणाऱ्या जवळपास एक हजार कामगारांना चिंताग्रस्त केले असून आपला रोजगार हिरावला जाऊ नये या भावनेतून कामगार वर्ग एकजुटीने कंपनीची बाजू पोटतिडकीने मांडत आहे. अशा परिस्थितीत राजकीय पाठबळामुळे केवळ शेतकऱ्यांनाच प्रशासकीय स्तरावर झुकते माप दिले जात आहे. त्यामुळे कामगार वर्ग लोकप्रतिनिधींकडे आपली बाजू मांडू लागला आहे. कंपनी बंद पडली तर शेतकऱ्यांचे शेतीचे नुकसान टळेलही (?) परंतु कामगार मात्र देशोधडीला लागणार ! पण कंपनीचे मात्र फारसे नुकसान होणार नाही. रसायनमिश्रीत सांडपाण्याचे घोंगडे कित्येक वर्षापासून तसेच भिजत ठेवण्यात आले आहे.
पावसाळा आला की ते आणखीच ओलेचिंब होते अन् या प्रकरणाला राजकीय वळण मिळते. हा प्रकार काही नवीन नाही. परंतु यावेळी मात्र मोजक्या शेतकऱ्यांकडून तक्रारींचा पाऊस व राजकीय हस्तक्षेप वाढल्याने कुठेतरी कंपनीच्या भवितव्याबाबत कामगारांमध्ये अस्वस्थता वाढीस आलेली दिसत आहे. या कामगारांमध्ये मलकापूर व मुक्ताईनगर तालुक्यातील भरणा असला तरी कंपनीने स्थानिक भूमिपुत्रांना सुद्धा कंपनीत नोकरीवर घेतले आहे. या भूमिपुत्रांच्या परिसरात शेत जमिनी असून कंपनीच्या पाण्यामुळे या शेत जमिनीचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होत नसल्याचा दावा या कामगारांकडून केला जात आहे. त्याचप्रमाणे कंपनीकडे स्वतःचा पाणी शुद्ध करण्याचा ईटीपी प्लांट असून काही स्थानिक कामगार या ईटीपी प्लांट वरच काम करतात. दरम्यान या प्लांटवर सांडपाणी पुनर्प्रक्रिया द्वारे शुद्धीकरण यंत्रणेमध्ये मल्टिपल इव्हापोरटर सिस्टीम मध्ये शुद्ध करून ते पाणी उत्पादन प्रक्रियेमध्ये पुन:श्च वापरले जाते. त्यामुळे सांडपाणी बाहेर येण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचेही या कामगारांकडून निवेदनाद्वारे ठासून सांगितले जात आहे. असे असले तरी शेतकऱ्यांकडून कंपनीच्या सांडपाणी बाबतची तक्रार कायम आहे. शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर प्रदूषण महामंडळाने येथील पाण्याचे नमुने तपासणीकरिता घेतले. त्याचप्रमाणे स्थानिक उपविभागीय अधिकारी यांच्या चमूने सुद्धा येथील पाण्याचे नमुने घेऊन वरिष्ठांकडे पाठवले आहे. या घडामोडींमुळे कामगारांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. वास्तविक पाहता शेतकऱ्यांचे नुकसान होत असेल तर त्यांना न्याय मिळालाच पाहिजे परंतु हा न्याय देतांना कंपनी बंद करणे हाच एकमेव पर्याय असेल तर कामगार निश्चितच देशोधडीला लागतील. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये व कंपनीही सुरू रहावी असा मध्यम मार्ग निघणे गरजेचे झाले असले तरी हा मार्ग निघणार तरी कसा व काढणार तरी कोण ? या बाब नेहमी प्रमाणे यावेळी सुद्धा घोंगडे भिजतच राहणार की काय हे येणारा काळच सांगू शकतो.