बुलडाण
एचआयव्ही बाधीतांना शासकीय योजनांचा लाभ द्यावा
तंबाखूचे सेवन अलिकडे तरूणांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. तरूणांना तंबाखूच्या सेवनापासून परावृत्त करणे हे मोठे आव्हान आहे. तंबाखू सेवनामुळे मुख कर्करोगाचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे तंबाखू सेवनाचे दुष्परीणामांबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती करावी, तंबाखूमुक्त शाळा, कोटपा कायद्याची अंमलबजावणी प्रभावीरित्या करावी, अशा सूचना अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांनी दिल्या आहेत. तंबाखू नियंत्रण कार्यक्रम व एड्स नियंत्रण कार्यक्रम आढावा बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला अति जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सांगळे, एड्स नियंत्रण कार्यक्रमाचे जिल्हा समन्वयक श्री. टाले, तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. लता बाहेकर आदी उपस्थित होते. एचआयव्ही बाधीतांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्याच्या सूचना करीत अप्पर जिल्हाधिकारी म्हणाले, याबाबत काही अडचणी असल्यास तालुका स्तरीय यंत्रणांशी समन्वय साधून सोडवाव्यात.संजय गांधी निराधार योजना लाभ देण्यासाठी उत्पन्न दाखल्याची अट, ऑनलाईन दुर्धर आजार प्रमाणपत्र आदींच्या अडचणी बाबत जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी संबंधित तहसिलदार यांच्याशी संपर्क करून अडचण सोडवावी. सेक्स वर्कर यांचे नियमित एचआयव्ही तपासणी करावी. राष्ट्रीय महामार्ग, रेल्वे लाईनवर गावांमध्ये लिंक वर्करच्या तपासण्या कराव्यात. जेणेकरून एखादा एचआयव्ही बाधीत तपासणी न करता रोगाचा वाहक बनू नये.मातृ वंदन योजनेच्या लाभार्थ्यांसाइी आधार बंधनकारक आहे. आधार नसल्यास आधार केंद्र चालकांशी संपर्क साधून आधार कार्ड बनवून घ्यावे. बैठकीत श्री. टाले, डॉ. लता बाहेकर यांनी सादरीकरण केले. बैठकीला संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.