तालुक्यातील नागमठाण ते चेंडूफळ या रस्त्याच्या कामाच्या उदघाटन पत्रिकेत भाजपाच्या नागमठाण गणाच्या सदस्या मुक्ताबाई डांगे यांचे नाव न टाकल्यामुळे सेना भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये श्रेयवाद रंगला. दोन वर्षांपूर्वी विधानसभेचे तत्कालीन अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याहस्ते या कामाचे भुमीपुजन करण्यात आले होते. रविवारी सराला बेटाचे मठाधिपती हभप रामगिरीजी महाराज व आमदार रमेश बोरनारे यांच्या हस्ते अर्थसंकल्पिय निधी अंतर्गत मंजुर झालेल्या २९ किमी लांबीच्या.नागमठाण ते चेंडुफळ या रस्त्याच्या डांबरीकरण व मजबुतीकरण कामाचे उद्घाटन करण्यात आले. मात्र शासकिय कार्यक्रम पत्रिकेत पंचायत समिती सदस्याचे नाव नसल्याने भाजपाचे सतीश शिंदे यांनी प्रशासनाचा निषेध केला. या रस्त्याचे काम भाजप-सेना युतीच्या काळात मंजूर झालेले असून, या कामावर ९ कोटी ३६ लाख ९६ हजार १६७ रुपये खर्च येणार आहे.रस्त्याच्या कामास १६ सप्टेंबर २०१९ ला प्रशासकीय मान्यता (प्रमा) मिळाली आहे.तत्कालिन विधानसभा सभापती हरिभाऊ बागडे यांच्याहस्ते १५ सप्टेंबर २०१९ रोजी या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सराला बेटाचे मठाधिपती ह.भ.प.रामगिरी महाराज होते तर माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष एकनाथराव जाधव, माजी नगराध्यक्ष डॉ.दिनेश परदेशी आदींची प्रमुख उपस्थिती होती.निधीअभावी गेल्या दोन वर्षांपासून हे काम रखडले होते. त्यानंतर सत्ताबदल होऊन राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले. तालुक्याचे शिवसेना आमदार रमेश बोरनारे व जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती अविनाश गलांडे यांनी जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत या रस्त्याचा विषय मांडून रस्त्याच्या कामासाठी निधी मंजूर करून आणला. २५ मार्च २०२१ रोजी या रस्त्याच्या कामाचा कार्यारंभ आदेश झाला. पण पत्रिकेत नागमठाण गणाच्या भाजप सदस्या मुक्ताबाई डांगे यांचे नाव न टाकल्याबाबत भाजपचे पदाधिकारी सतीश शिंदे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता एस.बी.काकड यांना विचारणा केली असता कार्यक्रमपत्रिका मी छापलेली नाही.कार्यक्रम पत्रिकेशी माझा काही संबंध नाही असे म्हणून त्यांनी हात झटकले. दरम्यान याबाबत सोशल मिडियावर सकाळपासुन जोरदार चर्चा रंगली आहे.