Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

जळगावात लागोपाठ दुसऱ्या दिवशी खून : प्रचंड खळबळ



जळगाव प्रतिनिधी मयुर् वाघुळदे
 काल निमखेडी रोड परिसरात एकाचा खून झाल्याने उडालेली खळबळ शांत होत नाही तोच आज शहरात पुन्हा एक नवीन खून झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. याबाबत वृत्त असे की काल निमखेडी रोड परिसरात एका व्यक्तीला कौटुंबिक वादातून त्याच्याच दोन्ही मुलांनी संपवण्याची भयंकर घटना घडली होती. याप्रकरणी कालच दोन्ही मुलांना अटक करण्यात आली आहे. खुद्द जन्मदात्या बापाचा खून करण्याच्या या कृत्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. दरम्यान यानंतर आज शहरात पुन्हा एक खून झाला आहे.

यासंदर्भात मिळालेली प्राथमिक माहिती अशी की शहरातील रथ चौकाला लागून असणाऱ्या आंबेडकर नगराच्या बाजूच्या परिसरातील राजू पंडित सोनवणे या व्यक्तीची डोके ठेचून हत्या करण्यात आली आहे. यासंदर्भात माहिती मिळताच पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून तपासाची चक्रे फिरवली आहेत. दरम्यान लागोपाठ दुसऱ्या दिवशी शहरात खून झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.

या खूनाचा प्रकार आज सकाळी उघड झाला. याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सहायक पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांनी घटनास्थळा भेट दिल्यानंतर प्रसारमाध्यमांना याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, काल रात्री झोपमध्ये असतांनाच राजी पंडित सोनवणे यांच्या डोक्यात वार करण्यात आला असून यात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या प्रकरणी अद्याप कुणाला अटक करण्यात आली नसल्याची माहिती देखील गवळी यांनी दिली. तर, शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा या प्रकरणी शनिपेठ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

प्राप्त माहितीनुसार राजू सोनवणे हे रिक्षाचालक होते. रिक्षा चालवून ते उदरनिर्वाह करत होते. त्यांचा खून पूर्व वैमनस्यातून झाला की, याला काही वेगळी किनार आहे याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. तथापि, पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवण्यास प्रारंभ केला असून लवकरच संशयित गजाआड होण्याची शक्यता आहे.