कुरुळा व दिग्रस मंडळात पिकांचे नुकसान
अंगद थोटे कुरुळा(बातमीदार)
यंदाच्या खरीप हंगामात झालेल्या आतिवृष्टीमुळे शेतीत उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.कुरुळा व दिग्रस महसूल मंडळातील हाती येणाऱ्या पिकांचे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट निर्माण झाले आहे. याकरिता पंचनामे न करता शेतकऱ्यांना सरसकट ५०,००० पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत शासनाने करावी अशी मागणी बाळासाहेब गोमारे यांनी केली आहे.
कुरुळा आणि दिग्रस महसूल मंडळात यंदाच्या खरीप हंगामातील ता.६ व ७ रोजी आतिवृष्टी होऊन हाती येणारी उभी पिके बाधित झाली.नदीकाठावरील शेतजमिनी खरडून गेल्या सोयाबीन,कापूस,तूर,मूग,उडीद यासह इतर पिकांचे अतोनात नुकसान झाले त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.मंडळातील शेकडो हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेल्याने बाधित झाली त्यामुळे बळीराजाच्या अपेक्षेवर पाणी फिरले आहे.मागील चार वर्षापासून दुष्कळाचा सामना करणारा शेतकरी पुरता हतबल झाला असून आर्थिक आधाराच्या प्रतीक्षेत आहे.यामुळे कुरुळा आणि दिग्रस मंडळातील शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत मिळावी अशी मागणी जिल्हा परिषद सदस्या शोभाताई गोमारे यांच्या वतीने बाळासाहेब गोमारे यांनी तहसीलदार कंधार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.